(फाइल फोटोः बरखा मदान)
मुंबईः बॉलिवूडचे करिअर सोडून बौद्ध धम्म स्विकारुन भिख्खूनी बनलेली अभिनेत्री बरखा मदान सध्या
आपल्या आगामी 'सुरखाब' या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. 22 मे रोजी रिलीज होणा-या या सिनेमात बरखाने जीत नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. ही तरुणी आपल्या भावाच्या भेटीसाठी कॅनडात येते, मात्र येथे ह्युमन टॅफ्किंगला बळी पडते. बरखाने 4 नोव्हेंबर 2012 रोजी संन्यास घेतला आहे.
आर्थिक तंगी किंवा करिअरची घडी नीट न बसल्याने बरखाने भिख्खूनी होण्याचा निर्णय घेतला असे नाहीये. 2002 मध्ये धर्मशाला येथे एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. येथे
दलाई लामा जोपा रिपोंचे यांची मते ऐकून तिचा बौद्ध धम्माकडे ओढा वाढला आणि तिने बौद्ध धम्म स्विकारुन भिख्खूनी होण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तिने दलाई लामा यांच्याकडे आपली ही इच्छा व्यक्त केली, तेव्हा बॉयफ्रेंडला कंटाळून हा निर्णय घेतला का?, असा प्रश्न त्यांनी तिला विचारला होता. विहारामध्ये राहण्याचा अर्थ तुम्ही कुणाला तरी कंटाळून येथे राहता असा होत नाही, असेही त्यांनी तिला म्हटले होते. त्यानंतर त्यांनी तिला बौद्ध धर्म दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. अखेर आपल्याला भिख्खू का बनायचे आहे, याचा विचार करण्यासाठी हा अभ्यास तिने करावा, असा त्या सल्ल्यामागील उद्देश होता.
यानंतर बरखाने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरु करुन त्यामध्ये दोन सिनेमांची निर्मिती केली होती. 'सोच लो' (2010) हा पहिला सिनेमा आणि दुसरा सिनेमा म्हणजे 'सुरखाब'. सिनेमांच्या निर्मितीच्या काही वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये बरखा पुन्हा एकदा काठमांडू येथील एका बौद्ध विहारात पोहोचली. तिथे तिने पुन्हा भिख्खूनी होण्याची इच्छा व्यक्त केली. तिला पुन्हा एकदा भिख्खूनी का बनायचे आहे, हा प्रश्न विचारला गेला. त्याचे उत्तर देताना तिने म्हटले होते, सर्वकाही सुरळीत आहे. मात्र तरीदेखील काही तरी आपल्या हातून निसटून जातंय, असं मला वाटतंय,
4 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी नऊ वाजता बरखाने सन्यांस घेतला. यावेळी तिचे आईवडीलसुद्धा उपस्थित होते. त्यांनी बरखाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. एकेकाळी ग्लॅमर इंडस्ट्रीतील झगमगाट राहिलेल्या बरखाच्या आलमारीत आता केवळ दोन जोडी कपडे आणि एक जोडी चप्पल आहे. याशिवाय एक मोबाइल आणि एक लॅपटॉप तिच्याकडे आहे. धर्मशाला येथे तिला मेटिटेशन करताना किंवा बौद्ध गया येथील तारा चिल्ड्रेन प्रोजेक्टमध्ये HIV ग्रस्त मुलांची सेवा करताना बघितले जाते.
एका मुलाखतीत बरखाने सांगितले होते, ''काही वर्षांपूर्वी मी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती, त्यावेळी परीक्षकांनी मला प्रश्न विचारला होता, की जर मी स्पर्धा जिंकले तर कुठले कार्य घेणार? तेव्हा मी उत्तर दिले होते, गरजू मुलांना मदत आणि त्यांची सेवा करण्याचा माझा निर्धार आहे. आज मी तेच काम हाती घेतले आहे.'' 1994 मध्ये ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, श्वेता मेनन यांच्यासह बरखा सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यावेळी ती हा किताब आपल्या नावी करण्यात अपयशी ठरली होती. मात्र मिस टुरिज्म इंटरनॅशनल या स्पर्धत रनरअप ठरली होती.
अनेक सिनेमांमध्ये केलाय अभिनय..
बरखा मदानने अभिनेत्री म्हणून 'खिलाड़ियों का खिलाड़ी'(1996), आणि 'भूत' (2003) या सिनेमात झळकली आहे. 'सोच लो' आणि 'सुरखाब' या तिच्या होम प्रॉडक्शनच्या सिनेमातही तिने अभिनय केला आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरही ती झळकली आहे. '1857: क्रान्ति', 'घर एक सपना' आणि 'सात फेरे' या टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
भारतात स्वतःच्या मठाची करायची आहे स्थापना..
'सोच लो' आणि 'सुरखाब' या सिनेमांच्या निर्मितीनंतर भविष्यात पुन्हा सिनेमा बनवणार का ? असा प्रश्न एका मुलाखतीत बरखाला विचारण्यात आला होता. सन्यस्थ जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा तिने व्यक्त केली. शिवाय भारतात स्वतःचा विहार तयार करण्याचीही तिची इच्छा आहे.
कॅनडात 'सुरखाब'ने जिंकले अवॉर्ड..
'सुरखाब'ने 2012 मध्ये कॅनडात अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. केवळ 25 दिवसांत हा सिनेमा तयार झाला. संजय तलरेजा हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून सुमित सूरी आणि विनीता मलिक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, साध्वी बनण्यापूर्वीची बरखाची निवडक छायाचित्रे...