आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anniv: ललिता पवारांच्या ग्लॅमरस करिअरला एका थापडेने केले होते उद्धवस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('रामायण' या मालिकेतील मंथराच्या भूमिकेत ललिता पवार (डावीकडे) आणि 'हिम्मत-ए-मर्दा' सिनेमातील एका दृश्यात (उजवीकडे) ललिता पवार)
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 99 वर्षे पूर्ण केली असती. ललिता यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी येवल्याचे (नाशिक) रेशमी आणि सुती वस्त्रांचे सधन व्यापारी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला होता. 24 फेब्रुवारी 1998 रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललिता यांनी अनेक हिंदी सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. मात्र 'रामायण' मालिकेत त्यांनी साकारलेली मंथराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
18 रुपये होती ललिता पवार यांची पहिली कमाई
ललिता पवार यांचे खरे नाव अंबू होते. वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांनी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करायला सुरुवात केली होती. आर्यन कंपनीच्या नानासाहेब सरपोतदारांनी त्यांना या क्षेत्रात येण्याची संधी दिली होती. ललिता पवार यांचे भाऊ मास्टर शांताराम सगुण या नावाने मूकपटात काम करत असे. नानासाहेब सरपोतदार यांच्याच कंपनीत ललिता पवार यांनी 18 रुपये मासिक पगारावर काम करणे सुरु केले. तर त्यांच्या भावाला 7 रुपये मासिक पगार मिळत होता. 1928 च्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून ललिता यांना मुख्य नायिकेच्या भूमिका मिळण्यास सुरुवात झाली. ‘गनिमी कावा’, ‘आर्य महिला’, ‘ठकसेन’, ‘पारिजातक’, ‘भीमसेन’, ‘पृथ्वीराज संयोगिता’, ‘नको गं बाई लग्न’, 'पतित उधार', 'सुभद्रा हरण', 'चतुर सुंदरी' हे त्यांचे मूकपट लोकप्रिय झाले होते.
'हिम्मत-ए-मर्दा'मध्ये दिसला ग्लॅमरस अवतार
ललिता पवार यांनी 1935 पर्यंत मुकपटात अभिनय केला. 1935 मध्ये त्या पहिल्यांदा बोलपटात झळकल्या. त्यांचा पहिला बोलपट होता 'हिम्मत-ए-मर्दा'. या सिनेमात ललिता पवार ग्लॅमरस अवतारात झळकल्या होत्या. विशेष म्हणजे या सिनेमातील सर्व गाणी ललिता यांनी स्वतः गायली होती. चार आठवडे हा सिनेमा हाऊसफुल्ल गर्दीत चालू होता. त्यानंतर 1936 मध्ये त्या सिनेनिर्मिती क्षेत्रात आल्या. त्यांची निर्मिती असलेला 'दुनिया क्या है' हा सिनेमा होता. 'नेताजी पालकर' आणि 'अमृत' या सिनेमांमध्ये त्या इमोशनल भूमिकेत झळकल्या होत्या.
एका थापडीने उद्धवस्त झाले करिअर
ललिता पवार अभिनेत्रीच्या रुपात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणयात यशस्वी ठरल्या होत्या. मात्र एका सिनेमाच्या सेटवर अभिनेते भगवानदादा यांनी मारलेल्या थापडीने त्यांचे करिअर उद्धवस्त केले होते. ही घटना 1942 मधील होती. त्यावेळी 'जंग-ए-आझादी' या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. भगवानदादाबरोबर एका प्रसंगाचे त्या चित्रण करीत होत्या. थंडीच्या दिवसात, तळ्यात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतो असा सीन होता. भगवानदादा पैलवान होते आणि फिल्मी दुनियेत नवखे होते. त्यांनी चुकून ललिता यांच्या कानफटीत एक सणसणीत ठेवून दिली. त्यामुळे ललिता यांच्या डाव्या डोळयाची रक्तवाहिनी फुटली, चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अ‍ॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्यांना मुख्य नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. त्या भूमिका पुढे ललिता यांना प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन गेल्या.
पहिले लग्न ठरले अयशस्वी
दिग्दर्शक जी. पी. पवार यांच्याबरोबर ललिता यांचा पहिला विवाह झाला आणि त्या अंबूची ललिता पवार झाल्या. जी.पी. पवारांबरोबर ललिता यांनी सात-आठ सिनेमेही केले होते. मात्र दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर ललिता यांनी अंबिका स्टुडिओचे मालक आणि निर्माते रामप्रकाश गुप्ता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला होता.
जे काम केले त्यात जीव ओतला...
डोळ्याला झालेल्या दुखापतीनंतर एका मुलाखतीत ललिता यांनी सांगितले होते, "माझे नायिका म्हणून करिअर संपुष्टात आले आहे, याची मला जाणीव झाली होती. कारण नायिकेसाठी सॉफ्ट फेसची गरज असते. मी निश्चय केला, की यापुढे ज्या भूमिका मिळतील, त्यात आपले सर्वोत्तम द्यायचे." 1962 मध्ये ललिता गृहस्थी या सिनेमात झळकल्या होत्या. हा सिनेमा ज्युबली हिट ठरला. या सिनेमासाठी त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले. ललिता यांनी आपल्या करिअरमध्ये 500 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनेय केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ललिता पवार यांची खास छायाचित्रे...