आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY: वहीदा यांची होती डॉक्टर होण्याची इच्छा, उमलण्याआधीच कोमेजले होते प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री वहिदा रहमान)

बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या अभिनेत्री वहीदा रहमान आज आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. वहीदा रहमान यांचा जन्म 14 मे 1936 रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट या गावात एका मुस्लिम कुटुंबात झाला.
डॉक्टर होण्याची होती इच्छा...
वहीदा यांना बालपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. त्यांनी आपली कारकीर्द तामीळ आणि तेलुगू सिनेमांपासून सुरू केली असली तरी त्यांच्या हिंदी सिनेमांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. त्यांना त्यांच्या करिअरमधला मोठा ब्रेक 'सीआयडी' सिनेमात खलनायिकेच्या रुपात मिळाला.
गुरुदत्त यांनी दिली मोठी संधी...
तामिळ सिनेमातील वहिदा यांचा जबरदस्त अभिनय बघून गुरुदत्त भारावले होते. त्यानंतर वहीदा गुरुदत्त यांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत सामिल झाल्या. हे दोघे आपल्या खासगी आयुष्यातही जवळ आले होते. 'प्यासा' या सिनेमानंतर रिलीज झालेला 'कागज के फूल' हा सिनेमा या दोघांच्या प्रेमावरच आधारित असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर या दोघांनी 'चौदहवीं का चाँद' (1980) आणि 'साहिब बीबी और गुलाम' (1962) या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. गुरुदत्त आणि वहीदा रहमान ही जोडी भारतीय सिनेमातील ऑन स्क्रिनवरील सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक होती.
प्रेम उमलण्याआधीच कोमेजले...
गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांचे प्रेम उमलण्याआधीच कोमेजले. 10 ऑक्टोबर 1964 रोजी गुरुदत्त यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे वहीदा रहमान कोलमडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःला सावरत 1965 साली 'गाईड' सिनेमात काम केले. हा सिनेमा तुफान गाजला होता. या सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. 'गाईड'नंतर 1968 साली रिलीज झालेल्या 'नीलकमल' या सिनेमाने वहीदा यांना यशोशिखरावर पोहोचवले.
अभिनेता कमलजीतसह लग्न...
1974 साली त्यांनी अभिनेता कमलजीतबरोबर लग्न करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर वहीदा बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुले आहेत. अनेक वर्षे सिनेमांमधून ब्रेक घेतल्यानंतर 1991 साली 'लम्हे' या सिनेमाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या. 2000 साली पतीच्या निधनामुळे त्यांना मोठा झटका बसला होता. मात्र पुन्हा एकदा स्वतःला सावरत त्यांनी 'दिल्ली 6' आणि 'रंग दे बसंती' या सिनेमांमध्ये काम केले आणि त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाल्या.
वहीदा यांचे गाजलेले काही निवडक हिंदी सिनेमे...
साहब बीबी और गुलाम
कागज के फूल
कूली
गाईड
चौदहवी का चाँद
तीसरी कसम
नीलकमल
प्यासा
रेशमा और शेरा
सी.आय.डी.
सोलवाँ साल
दिल्ली 6
रंग दे बसंती
वहीदा रहमान यांचे अन्य भाषांतील सिनेमे...
अभिजन (बंगाली)
अलीबाबावु 40 तिरुदगळु (तामीळ)
कालम्‌ मरी पोचू (तामीळ)
चुक्कलो चंद्रदु (तेलुगू)
जयसिंह (तेलुगू)
बंगावरु कलालु (तेलुगू)
रोजुलु मरायी (तेलुगू)
विश्वरूपम्‌ - 2 (तामीळ)
सिंहासन (तेलुगू)
वहीदा रहमान यांना मिळालेले पुरस्कार...
- वहीदा रहमान यांना गाईड (1965) आणि नील कमल(1968) या सनेमांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
- 'रेशमा और शेरा' (1971) या सिनेमासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
- 1972 साली वहीदा रहमान यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
- 2013 मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी सिनेमा पुरस्कार
- फिल्मफेअरचा आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलचा असे दोन जीवनगौरव पुरस्कार
आज वहीदा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा त्यांची खास छायाचित्रे...