आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boman Irani Will Host Bimal Roy Festival On Zee Classic

झी क्लासिकवर बोमन ईराणी सादर करणार ‘बिमल रॉय महोत्सव’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘वह जमाना, करे दीवाना’ या आपल्या ब्रीदवाक्याशी कायम राखत झी क्लासिक वाहिनीने गतकालातील काही अभिजात चित्रपटांच्या स्मृती जागवीत अभिजात मनोरंजनाचा पेटारा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय चित्रपटांचे अध्वर्यू आणि हिंदी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचे प्रवर्तक असलेल्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला आहे. आख्यायिका बनलेले महान निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे जीवन आणि कार्य यांची झलक दाखविण्यासाठी झी क्लासिक वाहिनीने बिमल रॉय महोत्सवाचे आयोजन केले असून नामवंत अभिनेते बोमन इराणी हे त्याचे सादरीकरण करणार आहेत.
बिमल रॉय यांच्या जीवनाशी निगडित असलेले काही अज्ञात व न ऐकलेले किस्से व घटनांवर बोमन इराणी या महोत्सवात प्रकाश टाकतील. या दिग्दर्शकाचे चित्रपट आज अर्ध्या शतकानंतरही नावीन्यपूर्ण वाटतात आणि आजच्या काळालाही लागू होतात. पाच भागांतील या साप्ताहिक मालिकेत या वाहिनीवर दर शनिवारी रात्री 8.00 वाजता रॉय यांच्या श्रेष्ठ कलाकृती सादर करण्यात येतील. 6 फेब्रुवारी रोजी दो बिघा जमीन चित्रपटाद्वारे याचा प्रारंभ होणार असून नंतर देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी हे चित्रपट दाखविले जातील.सत्यजित राय यांनी बिमलदांचा उल्लेख भारतीय चित्रपटांचे प्रवर्तक असा केला होता.
कोणत्याही निर्मात्याला आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वप्रथम बिमल रॉय यांची आठवण होत असे आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. दिग्दर्शक पी. सी. बरुआ यांच्या मार्गदर्शनाखाली बिमलदांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात छायाचित्रकार म्हणून केली. छायाचित्रकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता लेखक शरच्चंद्र यांच्या कादंबरीवर आधारित देवदास. उदयेर पाथे या बंगाली चित्रपटापासून ते दिग्दर्शक बनले. पुढे मुंबईत स्थायिक झाल्यावर त्यांनी थोडेच चित्रपट केले, मात्र त्यांच्या दो बिघा जमीन चित्रपटामुळे सार्‍या जगाने त्यांची दखल घेतली.
बिमल रॉय यांचा देवदास हा शरच्चंद्र यांच्या कादंबरीचे सार दर्शविणारा आणि सर्वाधिक वास्तव चित्रण झालेला अत्यंत यशस्वी चित्रपट आहे, असे भारतीय चित्रपटांच्या जाणकारांचे मत आहे. दिलीपकुमार, सुचित्रा सेन व वैजयंतीमाला यांच्या अप्रतिम अभिनयासाठी तो ओळखला जातो. 1960 वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व केलेला सुजाता हा त्यांचा अतिशय लोकप्रिय चित्रपट होय. अस्पृश्यता हा त्याचा विषय असून सुबोध घोष यांच्या एका बंगाली लघुकथेवर तो आधारित आहे. त्याचे साधे कथानक आणि अभिनेत्री नूतनने समजून-उमजून केलेल्या अभिनयाने तिला अनेक प्रशंसक मिळाले. नूतननेच बिमलदांच्या पुढील चित्रपटात, बंदिनीत नायिकेची भूमिका तशाच संवेदनशीलतेने साकारली.
बिमलदा आणि त्यांचे अभिजात चित्रपट सामान्य प्रेक्षकांपुढे सादर करण्याच्या कल्पनेने आनंदित आणि उत्साहित झालेला बोमन इराणी सांगतो, “झी क्लासिकवर बिमल रॉय फेस्टिव्हल सादर करण्याची संधी मला मिळाली, हा माझा सन्मान आहे, असं मी समजतो. बिमलदा हे स्वत:च एक संस्था होते. त्यांना जाऊन अनेक दशकं लोटली असली, तरी त्यांच्या चित्रपटांतून आणि त्यांच्या सादरीकरणातून आजही खूप काही शिकायला मिळतं. या महोत्सवाद्वारे आम्ही त्यांच्या चित्रपटांचा केवळ आस्वादच घेणार नाही, तर त्यांच्या चित्रपटनिर्मितीचा आनंदही घेणार आहोत. त्यांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन हे आजही लागू पडतात.”
चित्रपटांचे वेळापत्रक...
तारीखदिवसवेळचित्रपट
6 फेब्रुवारीशनिवाररात्री 8.00 वाजतादो बिघा जमीन
13 फेब्रुवारीशनिवाररात्री 8.00 वाजतादेवदास
20 फेब्रुवारीशनिवाररात्री 8.00 वाजतामधुमती
27 फेब्रुवारीशनिवाररात्री 8.00 वाजतासुजाता
6 मार्चशनिवाररात्री 8.00 वाजताबंदिनी