Home »News» Court Cancel Non Bailable Warrent Against Sanjay Dutt

संजय दत्तविरोधातील वॉरंट रद्द, चित्रपट निर्मात्याला धमकावल्याप्रकरणी काेर्टासमाेर हजर

विशेष प्रतिनिधी | Apr 18, 2017, 03:54 AM IST

मुंबई - चित्रपट निर्माता शकील नुरानी यांना धमकावणे आणि त्यांचे व्यावसायिक नुकसान केल्याप्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीसाठी अभिनेता संजय दत्त याने साेमवारी मुंबईतील अंधेरी न्यायालयात हजेरी लावली. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात शनिवारी जारी केलेले अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने संजय दत्त याला जरी दिलासा मिळाला असला तरीही यापुढच्या सुनावणीदरम्यान त्याला न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे.
नुरानी यांनी ‘जान की बाजी’ या चित्रपटासाठी संजय दत्त याच्यासोबत सन २००२ मध्ये करार केला होता. या करारानुसार त्याच वेळी संजय दत्त याला ५० लाख रुपये दिल्याचा दावा नुरानी यांनी केला होता. मात्र फक्त दोन दिवस चित्रीकरण केल्यानंतर संजय दत्तने काम करणे बंद केले होते. त्यामुळे नुरानी यांनी अभिनेता संजय दत्तकडे करारानुसार नुकसान भरपाईसह पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता.
मात्र संजय दत्तने आपले पैसे तर परत केले नाहीतच, शिवाय अंडरवर्ल्डमार्फत आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केल्याचा आरोप करत नुरानी यांनी त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. त्यामुळे अखेर नुरानी यांनी या प्रकरणी अंधेरी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर संबंधित न्यायालयाने संजय दत्तला हजर राहण्यासाठी यापूर्वी चार वेळा समन्स जारी केले होते. त्यावर १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट खटला आणि इतर अडचणींमुळे आपण न्यायालयात हजर राहू शकलो नाही, असा दावा संजय दत्तकडून करण्यात आला होता.

गैरहजेरीसाठी कारण ‘संपर्कातील त्रुटी’चे
वारंवार समन्स बजावूनही संजय दत्त हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्याला शेवटची नोटीस बजावली होती. तसेच सोमवारी न्यायालयात हजर न झाल्यास अटक वाॅरंट जारी केले जाईल, असे आदेशही शनिवारी दिले होते. त्यानुसार साेमवारी संजय दत्त न्यायालयात हजर राहिला होता. संजय दत्तचे वकील अॅड. सुभाष जाधव यांनी सांगितले की, ‘संपर्कामध्ये काही त्रुटी राहिल्याने हा प्रकार घडला असून यापुढच्या सुनावणीदरम्यान आपले अशील न्यायालयात हजर राहतील.’
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended