पणजी - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा संकल्प अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सिसर यांनी केला आहे. प्रमुख भूमिकेत ज्येष्ठ अभिनेता नसिरुद्दीन शहा यांना कास्ट करण्याची सिसर यांची इच्छा आहे.
‘बँक्स’, ‘हुनाबकू’, ‘ब्लड’, ‘अॅपरोडाइट’ इत्यादी चित्रपटामुळे सिसर जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांनी आता थिंकिंग ऑफ हिम नावाचा चित्रपट तयार करण्याचा निर्धार केला आहे. नसिरुद्दीन शहा हेच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांचे जीवन आणि तो काळ यांना दर्शवणारा आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून शांतीनिकेतन आणि अर्जेंटिनामध्ये त्यावर चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम मुंबईला जाऊन नसिरुद्दीन शहा यांची भेट घेण्याचा विचार करत आहे. चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी सिसर बोलत होते. टागोर यांच्यावर एखाद्या परदेशी दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट आहे.
सत्यजित रे, श्याम बेनेगलचे मोठे चाहते
भारतातील महान दिग्दर्शक सत्यजित रे, श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या अर्जेंटिनात खूप अधिक आहे, अशी माहिती सिसर यांनी दिली. भारतातील नवीन दिग्दर्शकांच्या पिढीची माहिती अर्जेंटिनातील प्रेेक्षकांना अद्याप झालेली नाही. म्हणूनच आम्ही अर्जेंटिनात चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.त्यात विविध भाषांतील भारतीय चित्रपटांना पाहायला मिळतील.
‘माझ्या कामाचा आनंद मी आता घेऊ लागलोय’
चित्रपट क्षेत्रात येऊन दोन दशके लोटली. करिअरच्या या वळणावर माझ्या कामाचा आनंद मात्र आता घेऊ लागलो आहे, असे मनोज वाजपेयी यांनी म्हटले आहे. ‘गँग्ज ऑफ वस्सेपूर’ फेम ४६ वर्षीय वाजपेयी म्हणाले, मी आता अभिनयाचा आनंद घेतोय. अनेक वर्षे नुसते कष्ट केले. परंतु आता गोष्टी कशा हाताळायच्या हे पक्के लक्षात आले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाव्यतिरिक्त कसे जगायचे याची जाणीव झाली आहे.