मुंबई -आपल्या शौर्याने भारत पादाक्रांत करणाऱ्या बाजीराव पेशवे यांच्यावरील "बाजीराव - मस्तानी' या चित्रपटानेही ६१ व्या फिल्मफेअर पुरस्कारांत रणांगण गाजवले.
६१ वा फिल्मफेअर सोहळा नुकताच पार पडला. यात संजय लीला भन्साळी यांच्या "बाजीराव-मस्तानी' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता (रणवीर सिंह), सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री (प्रियंका चोप्रा), सर्वोत्कृष्ट गायिका (श्रेया घोषाल), सर्वोत्कृष्ट नृ़त्य (बिरजू महाराज), सर्वोत्कृष्ट साहसी दृश्य ( शाम कौशल ) आणि इतर तीन विभागांत चित्रपटाने पुरस्कार पटकावले. इतर चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या "पीकू' चित्रपटाला गौरवण्यात आले.
गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा "बाजीराव- मस्तानी' आणि रोहित शेट्टी यांचा "दिलवाले' चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी दिलवालेने बाजीराववर मात केली. मात्र, दोन दिवसांनी बाजीरावने बॉक्स ऑफिसवर चांगल्या व्यवसायाला सुरुवात केली. काही दिवसांत चित्रपटाने ३०० कोटींच्या वर व्यवसाय केला. एकूणच शेट्टी आणि शाहरुख कंपनीच्या पदरी निराशाच पडली.
भन्साळी रॉक्स
याआधीच्या फिल्मफेअर पुरस्कारांत संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांनी घवघवीत यश संपादन केले होते. यात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या "ब्लॅक' चित्रपटाने ११ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. तसेच याआधीच्या "देवदास' चित्रपटाने १० पुरस्कार प्राप्त केले होते.
पीकूसाठी दीपिका सर्वोत्कृष्ट
"बाजीराव- मस्तानी' चित्रपटात आपल्या अभिनयाने दीपिका पदुकोण हिने सर्वांना भुरळ पाडली असली तरी पीकू या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. समारंभात पडद्यावर बाजीराव साकारणाऱ्या रणवीर सिंह याचेही अनेकांनी कौतुक केले.