आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आनंद’साठी खन्नांचे नाममात्र शुल्क, गुलजार यांनी दिला पहिल्या सुपरस्टारच्या आठवणींना उजाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सन १९७१ मध्ये बाॅलीवूडमध्ये सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘आनंद’ या चित्रपटासाठी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी नाममात्र शुल्क आकारले होते, अशी आठवण ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सांगितली.
गुलजार म्हणाले, १९७१ मध्ये दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी हे “आनंद’ची पटकथा घेऊन राजेश खन्ना यांच्याकडे गेले होते. त्या वेळी खन्ना हे आपल्या करिअरच्या यशोशिखरावर होते. या चित्रपटाची कथा त्यांना अतिशय आवडली होती. मात्र, आपल्या सुपरस्टारपदाचा बडेजाव न करता त्यांनी ‘आनंद’साठी अतिशय किरकोळ मानधन आकारले. चित्रपटाच्या अफाट यशानंतर खन्ना यांनी आपल्या बंगल्यावर एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते, असेही गुलजार यांनी सांगितले. या चित्रपटात सध्याचा महानायक अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतरच अमिताभ बच्चन यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली अाणि राजेश खन्ना यांची लाेकप्रियता काहीशी कमी हाेत गेली.

‘आनंद’ चित्रपटासाठी गुलजार यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. पुढे गुलजार म्हणाले, हृषीकेश मुखर्जी हे अतिशय दर्जेदार िदग्दर्शक होते. त्यांनी “आनंद’साठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यांचे खूबसूरत आणि चुपके चुपके हे चित्रपटही प्रचंड गाजले होते. या कार्यक्रमात गुलजार यांनी आर. डी. बर्मन, संजीवकुमार यांच्याही आठवणींना उजाळा दिला. तसेच नव्या पिढीतील ए. आर. रहमान, विशाल भारद्वाज आणि इतर संगीतकारांसोबत केलेल्या कामाचे अनुभव कथन केले.

८२ व्या वर्षातही तोच जोश
गुलजार गेल्या साठ वर्षांपासून बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत. आजच्या घडीला त्यांचे वय ८२ वर्षे आहे. मात्र, आजही त्यांचा जोश तरुणांसारखाच आहे. गुलजार यांची गीते असलेला “मिर्झिया’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर यांच्या भूमिका आहेत.
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...