बॉलीवूडच्या ए-लिस्टर्सना मनसेचा इशारा
महाराष्ट्रात सध्या दुष्काळ पडला आहे. पावसाअभावी यंदा शेती कशी करायची, हा यक्ष प्रश्न शेतक-यांना सतावतोय. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय. एकिकडे दिवाळखोरीमूळे शेतकरी नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग स्विकारतोय. तर दुसरीकडे १०० कोटींची उड्डाणे नित्यनियमाने घेत मायनगरी मुंबईतलं बॉलीवूड पार्ट्या करतंय. ह्यामूळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना चिडली आहे.
मनसेने आता ‘बॉलीवूडकरांनी शेतक-यांना आर्थिक मदत करावी, अथवा इथून पूढे त्यांच्या अडचणींना मनसे धावून जाणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. याविषयी मनसेच्या चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर ह्यांनी एक पत्रक काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी बॉलीवूडच्या स्टार्सना मदतीचे आवाहन केले आहे.
अमेय खोपकर म्हणतात, “१०० कोटी कमावल्याचा दावा करणा-या मायानगरीतल्या ए-लिस्टर्सनी शेतक-यांना मदत करायलाच पाहिजे. फक्त मराठी फिल्म इंडस्ट्रीलाच महाराष्ट्रातले शेतकरी अन्न देतात का? बॉलीवूडचे लोकं ही ह्याच मातीत पिकलेलं खातात, ना. मग मदत करा, असं सांगायला कशाला लागतं? ते तर आपणहून व्हायला हवं, ना. फक्त आमिर खान आणि सलमान खानलाच महाराष्ट्रात प़डलेला दुष्काळ दिसतो का? बाकी लोकांना ही माहिती का असू नये? त्यांनी का पुढाकार घेऊ नये?”
अमेय पूढे म्हणतात,“दरवेळी मनसेला येऊन आवाहन किंवा इशारा करावा लागतो. तेव्हा कुठे ह्या लोकांचे डोळे उघडतात. सलमानने ‘बिइंग ह्युमन’तर्फे पाण्याच्या टाक्या दिल्या. आमिरने जलयुक्त शिवारासाठी पुढाकार घेतला. पण अनेक निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री जे आपल्या चित्रपटाने शंभर कोटी कमावल्यावर आनंदाने जाहिराती करतात आणि पार्ट्या झोडतात. त्यांना ही कळकळ का असू नये? की अन्नदाता भुकेला आहे. तो थोड्याशा हजार रूपयांच्या कर्जापोटी आत्महत्येचा मार्ग स्विकारतोय?”
अमेयने बॉलीवूडला इशारा देत म्हटलं, “बॉलीवूडला जेव्हा अडचण येते, शुटिंगमध्ये खोळंबा होतो, किंवा एखादा अभिनेता अडचणीत सापडतो, तेव्हा हे लोक मनसेकडे येतात. पण जर आत्ता बॉलीवूडने शेतक-यांना आर्थिक मदत केली नाही, तर ह्यापूढे मनसेही बॉलीवूडच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही, आणि ह्या इशा-याला कोणी धमकी समजलं तरीही चालेल .”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, इंग्रजी मिडीयावर का कोपलं, मनसे ?