मुंबई- 'या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस येथून निरोप घ्यायचाच आहे. या जगाचा निरोप घेताना तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा घेऊनच जाईन. परंतु, सध्या तरी मी उत्तम आहे. माझी तब्बेत चांगली असून, माझ्याबद्दलच्या अफवा कृपया आता तरी थांबवा. माझ्या कुटुंबियांना याचा कमालीचा त्रास होतो' असा अर्जाव करीत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी
आपल्या निधनाबाबत सोशल मिडियात उठलेल्या अफवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कादर खान यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची अफवा पुन्हा एकदा सोशल मिडियात उठवली गेली. यानंतर कादर खान यांना श्रद्धांजलीचे वाहणारे संदेश सोशल मिडियात व्हायरल झाले. रविवारी सकाळी तर अनेक जण याबाबत चौकशी करीत होते. कादर खान यांच्या मृत्यूबाबत आतापर्यंत तीनदा सोशल मिडियावर अफवा पसरविण्यात आली आहे. प्रत्येक वेळी अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांकडे याबाबत विचारणा केली होती. रविवारीही अनेकांनी कादर खान यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यामुळे खान यांच्या नातेवाईकांना जवळच्या लोकांना सांगताना नाकी नऊ आले होते.
अखेर या घटनेनंतर खुद्द कादर खान यांनीच मौन सोडले असून, माझ्या निधनाची अफवा थांबवा असे आवाहन केले. सोशल मिडियात आपल्या निधनाबाबत येत असलेल्या संदेशामुळे ते कमालीचे नाराज झाले आहेत.
79 वर्षीय कादर खान सध्या मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. सार्वजनिक वावर त्यांचा आता थांबलेला आहे. कादर खान यांनी आपल्या अभिनयाने व विनोदी शैलीने प्रत्येक भारतीयाला निखळ आनंद दिला आहे. 'हो गया दिमाग का दही' हा फौजिया आरशी यांच्या चित्रपटात शेवटचे ते दिसले आहेत.
कादर खान यांनी अभिनेता अनुपम खेर यांच्यावर नुकतीच टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय अनुपम खेरने दुसरे काय केले आहे? अनुपम खेर याचे असे काय योगदान आहे जेणेकरून त्याला पद्म पुरस्कार दिला गेला पण मला मिळाला नाही, असा सवाल जुनेजानते व बुर्जूर्ग अभिनेते कादर खान यांनी उपस्थित केला होता. बरं झालं मला पद्म मिळाला नाही. पण मी कोणाची स्तुती करणार नाही असेही कादर खान यांनी म्हटले होते.