रितेश देशमुख सध्या रवी जाधव दिग्दर्शित ‘बँजो’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ह्या सिनेमात तो एका बँजो वादक मराठी मुलाच्या भुमिकेत आहे. तराट हे त्याच्या भूमिकेचं नाव. सध्या सिनेमाचा भव्य सेट वरळी कोळी वाड्यात उभारण्यात आलाय. आणि हा भव्य सेट म्हणजे आहे, एक तुटलेलं जहाज. ८०/६० फूटांचा हा सेट आहे. ह्या सेटवर रितेश देशमुख आणि सिनेमाची हिरोइन नर्गिस फाखरीमध्ये बरेचसे सीन चित्रीत होत आहेत.
सिनेमाच्या सेटचं वैशिष्ठ्य सांगताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “हा आहे, तराट(रितेश देशमुख)च्या बँजो प्रॅक्टिसचा अड्डा. जुन्या जहाजासारखं बँजोवादकांचं आयुष्य असतं. मला असं वाटतं, सेट हा फक्त नुसता सेट नसावा, तर ती वास्तू सुध्दा कथानकाचा एक हिस्सा असावा. वास्तूनेही तुटलेलं, दुभंगलेलं आयुष्य सिनेमातून सांगावं. म्हणूनच हा सेट आहे.”
“आता पहा ना, बँजो ग्रुप्स इतक्या वर्षापासून एखाद्या जुन्या जहाजासारखे
आपल्या आयुष्यात एवढे रूतलेले आहेत. पण आपण त्यांना कधीच त्या गर्तेतून बाहेर काढलेलं नाही. ह्याचचं हा सेट प्रतिनिधीत्व करतो. गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनी झालेल्या चित्ररथांच्या परेड सोहळ्यात ज्याने आपला महाराष्ट्राचा चित्ररथ बनवला त्याच सेट डिझाइनर शेखर मोघेने हा जहाजाचा सूध्दा सेट बनवलाय. आणि ह्याचं वैशिष्ठ्य म्हणजे हा सेट त्याने फक्त सहा दिवसात उभा केलाय. बांधकाम एवढं पक्क आहे, की भरती ओहोटी आली तरीही सेटला आजपर्यंत जराही नुकसान झालेलं नाही. हा सेट वरळी कोळीवाड्यात एवढा टोकाला आहे, की आम्हांला काही मागवायचं असेल, तर सामान टेम्पोने नाही तर बोटीने आणावं लागतं.”
वरळी कोळी वाड्यात रितेश देशमुख आणि रवी जाधवला सध्या रोज ताज्या माश्यांची मेजवानीही मिळतेय. रवी म्हणतो, “बालक-पालक आणि टाइमपासचे एवढे चाहते वरळी कोळीवाड्यात आहेत, की, मला रोज प्रत्येकाच्या घरातून ताजे मासे बनवून मिळतात.”
सिनेमाच्या कथानकाबाबत सांगताना रवी जाधव म्हणतो, “बँजो सिनेमा सुरू करण्याअगोदर गेली तीन वर्ष मी ह्या सिनेमावर काम करतोय. फक्त महाराष्ट्रातच नाही, गुजरात, राजस्थानमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या बँजो ग्रुप्सचे आम्ही व्हिडीयो इंटरव्ह्युज केले. त्यांच्या अडचणी, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. ते कसे जगतात, उदरनिर्वाहासाठी नक्की कशी धडपड करतात. त्यावर सखोल अभ्यास केला. आणि मग कपिल सावंत आणि निखील मल्होत्रा ह्या दोन लेखकांनी संवाद लेखन केलं. उमेश कुलकर्णीची राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पहिली शॉर्ट फिल्म ‘गिरणी’चं चित्रीकरण करणारा मनोज लोबो माझ्या ह्या सिनेमाचं सिनेमॅटोग्राफर आहे. एकुणच सिनेमा झकास बनेल ह्यात शंकाच नाही.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बँजो सिनेमाच्या सेटचे फोटो