आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About 46th International Film Festival Of India

46th IFFI : कसा रंगतो इफ्फी सोहळा, जाणून घ्या पडद्यामागील Interesting Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गोव्यात 46 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) सुरू झाला असून या महोत्सवातील घडामोडी, चर्चासत्रे व रसिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चित्रपट समीक्षक व अभ्यासक शशिकांत सावंत देत आहेत… या भागात शशिकांत सावंत यांनी इफ्फीतील पडद्यामागील रंजक घडामोडी सांगितल्या आहेत...
महोत्सवातील शेकडो चित्रपटांतून चांगला चित्रपट कसा निवडायचा याचे अनेक ठोकताळे आहेत. मुख्य म्हणजे महत्त्वाची एक भलीलठ्ठ पुस्तिका प्रत्येकाला देण्यात येते. ज्यात चित्रपटांचे नाव, चित्रपटातील दृश्य व चित्रपटाचे कथानक दिलेले असते. बहुतेक मंडळी सिनेमा सुरू होण्याच्या आधी वाचताना दिसतात. काही जण सुरुवातीला हे वाचून खुणा करतात. महोत्सवात दरवर्षी २ वर्तमानपत्र निघतात. एक महोत्सवाची माहिती देणारं आणि दुसरं छोटसं साध्या कागदावर छापलेलं चटपटीत माहिती देणारं. यातून भरपूर माहिती मिळते. रोज सकाळी हे प्रसिद्ध होतं. महोत्सवासाठी प्रत्येकाला कार्ड दिलेलं असलं तरी प्रत्येकाला तिकीट काढावे लागते. समजा थेटरची क्षमता २५० असेल तर २५० तिकीटे देण्यात येतात. सिनेमा हाऊसफुल होतो. पण थांबा, प्रतिनिधींची यामुळे निराशा होत नाही. कारण अनेकजण तिकीटे घेतात पण सिनेमाला येतच नाही. यामुळे अनेक जागा रिकाम्या असतात. म्हणून ज्यांच्याकडे तिकीटे नसतात अशी मंडळी हॉलबाहेर उभी असतात. परिणाम असा होतो की सिनेमागृहाच्या बाहेर २ रांगा लागलेल्या दिसतात. एक तिकीटे घेतल्यांची व तिकीटे नसताना सिनेमा सुरू झाल्यावर ज्यांना प्रवेश हवा असतो अशांची. त्यामुळे सतत रांगा आयनॉक्ससमोर दिसत राहतात. मंडळी कला अकादमीत जाणं पसंद करतात. कारण हजार जणांची क्षमता असल्यामुळे तिथे सिनेमा पाहायला जागा मिळते.
चित्रपट महोत्सवाचा मोठा फायदा असतो की अनेक दिग्दर्शक, अभिनेते तुम्हांला प्रत्यक्ष भेटतात. जाता येता कुणाशीही आपण गप्पा मारू शकतो. बरं, भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला समोरचा माणूस हा चित्रपटाबद्दल दर्दी आहे, चित्रपटाबद्दल उत्सुकता दाखवणारा आहे हे माहीत असतं. याच कारण अनेक मंडळी इथे हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत. अगदी आसामपासून जिथून येण्यासाठी ३-४ रात्रीचा प्रवास करावा लागतो. तिथलेही विद्यार्थी इथे भेटतात. दुसरं म्हणजे मुंबई-पुणे, महाराष्ट्र यातील नवे-जुने चित्रकर्मी भेटतात. संदीप सावंत, नीरजा पटवर्धन, चित्रा पालेकर, अशोक राणे, रेखा देशपांडे, मीना कर्णिक हे इथे दिसणारे दरवर्षीचे चेहरे. पत्रकार निखिल वागळेही या महोत्सवाला उपस्थित होते. क्रांती पाटकर ही तरुणी गेली १२ वर्ष महोत्सवाला येणारी तरुणी. खरं तर ती चित्रपटात काही करत नाही. अनेकांना ती अभिनेत्री असावी असे वाटतं. मुख्य म्हणजे तिने विशीतच चित्रपट पाहण्यास सुरुवात केल्यामुळे तिला अनेकजण ओळखतात. तिच्यासारखे अनेकजण चित्रपट महोत्सवामुळे जसा व्हॉट्स अपवर ग्रुप तयार होतो तसा तिचा एक ग्रुप तयार झालेला आहे. ती जशी चित्रपटांच्या आकर्षणामुळे व मित्र-मैत्रिणींना भेटण्याच्या आकर्षणाने येते त्याप्रमाणे मीही इथे येतो. मीही १९९६ पासून चित्रपट महोत्सव पाहतो. इथे आलेली अनेक मंडळी तेव्हापासून येत आहेत. बी. बी. चतुर्वेदी हे त्यातील एक नाव. हे गृहस्थ आज ८० वर्षाचे आहेत. भारताचा हा ४६ वा चित्रपट महोत्सव आहे. त्यातील त्यांनी ४२ चित्रपट महोत्सव पाहिलेले आहेत. पंडीत नेहरुंनी उद्‍घाटन केलेल्या पहिल्या महोत्सवालाही ते होते. ते सांगतात, “अनेकदा इंदिरा गांधी आमच्याबरोबर येऊन चित्रपटाला बसायच्या. तेव्हा सुरक्षा वगैरे काही भानगड नव्हती. शांतपणे गप्पा मारत, फेस्टीव्हल आम्ही एन्जॉय करायचो. आता मात्र सुरक्षा कडक आहे. सर्वत्र मेटल डिटेक्टर व सुरक्षारक्षक तैनात केलेले आहेत. हे दृश्य जरा माझ्यासारख्याला विचित्र वाटतो.”
गोव्याच्या फेस्टीव्हलचे वेगळेपण असे की गोव्यात फेस्टीव्हल चालू असताना बाहेरही फेस्टीव्हल चालू असतो. मी ज्या लॉजवर राहतो त्या मैदानावर त्यादिवशी ‘मंथन’ दाखवण्यात आला. परवा अबीर गोपाल कृष्णांचा कोणतातरी चित्रपट दाखवण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावरही काही सिनेमे दाखवण्यात येतात. शिवाय गोव्यात राहणाऱ्या सामान्य माणसाला व पर्यटकांना १०० किंवा २०० रुपये देऊन दिवसभरात ३ सिनेमा पाहण्यासाठी तिकिटे देण्यात येतात. अशा प्रकारे या महोत्सवाने सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
एकेकाळी चित्रपट महोत्सवात अनसेन्सॉर्ड चित्रपट याचं मोठं आकर्षण होतं. प्रणय दृश्य, मोकळेपणाने घेतलेले बेड्स सीन हे लोकांना केवळ फेस्टीव्हलमध्ये पाहायला मिळतात. आता इंटरनेटच्या जमान्यात याचे आकर्षण राहिले नाही असे वाटत असले तरी परवा दाखवलेली ‘लव्ह’ नावाची फ्रेंच फिल्म इतकी लोकांनी डोक्यावर घेतली की ती १२ वाजता पुन्हा दुसरा शो ठेवण्यात आला. थोडक्यात काय, तर लोकांचे आकर्षण अजून संपलेले नाही. या चित्रपटाचे पोश्टर पाहूनच लोकांनी तिकीटे बुक केली होती. पॅरिस मध्ये राहणारी अमेरिकन व पॅरिसमधील दोन मुलींच्या नात्याची कहाणी सांगते. याचं वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी २ किंवा ३ नी मिळून केलेली प्रणय दृश्ये. यामुळे चित्रपट धक्का देतो आणि अर्थातच चित्रपटाला प्रचंड गर्दी लोटते. इफ्फी ही एक चित्रनगरी आहे. जिच्यामध्ये सुरुवात होते ती आयनॉक्स थेटरपासून. आयनॉक्सची ४ थेटर्स आहेत. जिथे क्रमाक्रमाने दिवसभर चित्रपट दाखवले जातात. अगदी रात्री ११ वाजताही शो असतो. दुसरीकडे मार्सीनेस्ट नावाच्या थेटरमध्ये छोटी वर्कशॉप्स किंवा चित्रपट दाखवले जातात. डाव्या बाजूला मीडीया सुविधा आहे. जिथे मोफत सर्व सुविधा म्हणजे कंप्युटर, फोन, स्कॅनर शिवाय चहा-कॉफीचा भरपूर पुरवठा करणारी मशीन आहे. मला ईमेल्स मिळत नव्हती. मी सांगितल्यावर त्यांनी धावाधाव करुन तप्तरतेने ती मिळवून दिली. अशा प्रकारे सगळा स्टाफ तत्पर असतो. पीआयबी म्हणजे सरकारी यंत्रणा. पण त्याच्या जोडीला गोव्याच्या महोत्सवाने एक नवीन गोष्ट केली ती म्हणजे कॉलेजच्या तरुण-तरुणींना तत्सम रकमेवर ही मुलं सकाळपासून राबत असतात. महोत्सवाच्या प्रागंणात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला किंगफिशचा स्टॉल आहे. तिथे गर्दी नसली तरी ३-४ माणसं उभी असतात. महोत्सवाच्या प्रांगणात चक्क लोक बिअर पीत बसलेले असतात. पूर्वी इथे व्हिस्कीही मिळत असे. पण नंतर ते बंद करण्यात आलं. २००४ पूर्वी याची कल्पनाही केलेली नसेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इफ्फीत क्लिक झालेली खास छायाचित्रे...