मुंबईः दीर्घ काळापासून आजारी असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान उपचारांसाठी हरिद्वारस्थित बाबा रामदेव यांच्या पतंजली आश्रमात पोहोचले आहेत. येथे त्यांना रुम नं. 303मध्ये ठेवण्यात आले आहे. योगपीठाचे आचार्य बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीनंतर कादर खान यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरु होणार आहेत. लवकरच ते पूर्णपणे बरी होतील, अशी आशा आहे.
कादर खान यांनी आपल्या तुफान कॉमेडी टायमिंगसाठी ओळखले जाते. त्यांनी आता वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांची प्रकृती वयोमानामुळे त्यांची साथ देताना दिसत नाहीय.
'मी पूर्णपणे बरा तर होईल ना?'
मुंबईहून हरिद्वारपर्यंतच्या प्रवासात ते एकच प्रश्न वारंवार विचारत होते 'मी ठीक होईल ना?' अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिलीय. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका हॉस्पfटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. येथे एका नर्सच्या चुकीमुळे ते स्ट्रेचरवरून खाली पडले. यामुळे, त्यांच्या आवाजावर परिणाम झालाय... शिवाय गुडघ्यांनाही चांगलाच मार बसलाय. यामुळे त्यांच्या समस्यांमध्ये अधिक वाढ झालीय.
कादर खान यांनी काही दिवसांपूर्वीच हजचाही दौरा केलाय. त्यानंतर आयुर्वेदिक उपचारांसाठी त्यांनी पतंजली योगपीठाचा आसरा घेतला.
'हो गया दिमाग का दही' या सिनेमाद्वारे कमबॅक
याचवर्षी रिलीज झालेल्या 'हो गया दिमाग का दही' या सिनेमाद्वारे त्यांनी दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या सिनेमात त्यांच्यासोबत ओम पुरी, रज्जाक खान, संजय मिश्रा आणि राजपाल यादव हे कलाकार होते. याच सिनेमाचे दिग्दर्शक फौजिया अर्शी आणि निर्माते संतोष भारतीय त्यांना पतंजली योगपीठात घेऊन गेले आहेत.
अभिनेतेच नव्हे तर प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटरसुद्धा आहेत कादर खान
कादर खान यांनी अभिनेते, डायलॉग आणि स्क्रिप्ट रायटर आणि दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलंय. 1973 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अभिनेता, व्हिलन, कॉमेडियन अशा विविध ढंगात आणि रुपात प्रेक्षकांनी कादर खान यांना पाहिले आहे. त्यांच्यावर चित्रीत झालेले अनेक डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन स्टारर 'शराबी', 'कुली', 'देश प्रेमी', लावारिस', 'मुकद्दर का सिकंदर', 'परवरिश', 'मिस्टर नटवरलाल', 'खून पसीना' आणि 'हम' या गाजलेल्या सिनेमांचे डायलॉग्स कादर खान यांनीच लिहिले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पतंजली योगपीठात पोहोचलेल्या कादर खान यांची काही छायाचित्रे...