आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप नेत्यांच्या धमकीनंतर ‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबले; 1 डिसेंबरला होणार होते प्रदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संजय लीला भन्साळी यांचा प्रदर्शनापूर्वीच विविध वादांमुळे गाजलेला चित्रपट ‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. निर्मात्यांनी  नियोजित तारखेनुसार १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नंतर जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान, या चित्रपटांतील आक्षेपार्ह दृश्यांवरून देशभर सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या दृश्यांमध्ये आवश्यक ते बदल करूनच तो प्रदर्शित केला जावा, अशा आशयाचे पत्र राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाठवले होते. 


भाजप नेत्याकडून १० काेटींचे बक्षीस

अभिनेत्री दीपिका व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना मेरठच्या युवकांनी ५ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. यावर भाजपचे हरियाणातील नेते सूरज पाल यांनी जो कुणी हे काम करेल त्याला १० कोटी देईन, अशी घोषणा केली.

 

 

कायदा-सुव्यवस्थेचा विचार
चित्रपटाची निर्माती कंपनी व्हायकॉम-१८ मोशन पिक्चर्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, पद्मावतीला होत असलेला विरोध पाहता कायदा व सुव्यवस्था तसेच चित्रपटाला मंजुरी देणाऱ्या केंद्रीय महामंडळाचा (सीबीएफसी) विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. लवकरच मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. चित्रपटात वास्तविक राजपुतांचे शौर्यच दाखवण्यात आले असल्याचा दावाही त्याने केला. 

 

करणी सेनेला धमकी
चित्रपटाला विराेध करणाऱ्या करणी सेनेचे महिपालसिंह मकराना यांना पाकमधून धमकी आली. मकराना म्हणाले, पाकमधील एका नंबरवरून हा फाेन आला. चित्रपटाला विरोध केला तर सेनेचे प्रमुख लोकेंद्रसिंह कलवींची हत्या करू, १९९३सारखे बॉम्बस्फोट घडवू असे धमकावण्यात आले. 

 

रणवीरचे पाय तोडू
भाजप नेते सूरज पाल यांनी अभिनेता रणवीरसिंह यालाही पाय तोडण्याची धमकी दिली. चित्रपटाच्या समर्थनार्थ रणवीरने केलेली वक्तव्ये मागे घ्यावीत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषाधिकार वापरून हा चित्रपट बंद पेटीत टाकावा, असे सूरज पाल यांनी म्हटले आहे.

 

इंग्रजांची गुलामी स्वीकारणारेच आता रस्त्यावर...
हे राजपूत राजे-महाराजे कधी इंग्रजांशी तर लढले नाहीत. आता रस्त्यावर उतरत आहेत. इतिहासात यांनी इंग्रजांची गुलामी स्वीकारली होती. आता त्यांनी प्रतिष्ठेच्या गोष्टी करू नयेत, असे जावेद अख्तर यांनी एका दूरचित्रवाणीवर बोलताना म्हटले आहे. 

 

सेन्सॉर बोर्डाकडून प्रायव्हेट स्क्रिनिंगवर नाराजी...  
- बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय विविध वाहिन्यांसाठी चित्रपटाचे स्क्रीनिंग केल्यावरून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 
- प्रसून जोशी म्हणाले, सेन्सॉर बोर्डाने अजून चित्रपट पाहिलेला नाही, परंतु तो माध्यमांना दाखवण्यात येतो आहे. राष्ट्रीय वाहिन्यांवर या चित्रपटाची समीक्षा होते आहे. निर्मात्यांचे असे वर्तन चित्रपट उद्योगासंबंधी असलेल्या नियम व कायद्याची पायमल्ली करण्यासारखे आहे. याचाच अर्थ सेन्सॉर बोर्डाला आपल्या मर्जीनुसार वापर करून घेण्याचा प्रकार आहे असा होतो.
- एकीकडे निर्माते चित्रपटास प्रमाणपत्र देण्यास विलंब झाल्याचा कांगावा करत सेन्सॉर बोर्डाला जबाबदार धरत आहेत. बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया घाईघाईने उरकण्याचा घाट घातला जातोय. यासाठी बोर्डावर दबाव आणला जातोय, असे सांगून जोशी म्हणाले, दुसरीकडे नियमाच्या विरोधात जाऊन निर्माते चित्रपटाचे स्क्रीनिंग करत आहेत. बोर्डाकडे समीक्षा करण्यासाठी याच आठवड्यात चित्रपट पाठवण्यात आला होता, असे जोशी यांनी सांगितले. 

 

'पद्मावती'वरुन का निर्माण झाला आहे वाद? 
- करणी सेना, भाजप नेते आणि हिंदूत्ववादी संघटनांनी 'पद्मावती' या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे.  
- करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना म्हणाले की, चित्रपटात जर राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांना स्वप्नातील दृश्यात एकत्र दाखवले गेले, तर राजस्थानात हा चित्रपट रिलीज होऊ दिला जाणार नाही. राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांचा एकत्रित असलेला चित्रपटातील प्रत्येक सीन हटवायला हवा. 
- यापूर्वी जयपूरमध्ये शुटिंगदरम्यान काही लोकांनी संजय लीला भंसाळी यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये लावलेला सेटही जाळण्यात आला होता.

 

पुढे वाचा, ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी केले आहे चित्रपटाचे समीक्षण... खरंच 'पद्मावती' वादग्रस्त आहे का... 

बातम्या आणखी आहेत...