बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा स्टारर 'बाजीराव मस्तानी' सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिनेमाच्या सेटवरून खूनाच्या आरोपात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बातमी आहे, की अनिल गिरी नावाच्या एका व्यक्तीला 20 ऑक्टोबरला सिनेमाच्या सेटवरून पुण्यात अटक करण्यात आली आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, सेटवर स्पॉट बॉय म्हणून काम करणारा अनिल 2007मध्ये झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येचा आरोप आहे. अनिलने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी 30 दिवसांची पॅरोल मागितली होती, परंतु पॅरोल मिळाल्यानंतर तो पुन्हा तुरुंगात गेलाच नाही.
त्याची अनुपस्थिती पाहून तुरुंग अधिका-यांनी अनिलच्या घराजवळील नाका पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना अनिल 'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या सेटवर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांची टीम अनिलच्या फोटोसह पुण्याला पोहोचली आणि तिथून त्यांनी अनिलला अटक केली.
याविषयी अद्याप सिनेमाचे दिग्दर्शक किंवा इतर लोकांना माहिती देण्यात आलेली नाहीये.