आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता बाॅलीवूडचेही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चमत्कार झाला नि गर्भवती नायिका सुखरूप बाळंत झाली किंवा कोमात गेलेला नायक अचानक ‘अब तो इसे भगवानही बचा सकते हैं’ धर्तीवर शुद्धीत येतो... अशा प्रकारे वैद्यकीयदृष्ट्या चुकीची वा न पटणारी दृश्ये हिंदी चित्रपटांमध्ये सर्रास पाहायला मिळतात. आता मात्र हॉलीवूडप्रमाणेच या दृश्यांचे ‘हेल्थ चेकअप’ होऊन अचूक दृश्येच दाखवली जाणार आहेत. अलीकडेच एशियन सेंटर फॉर एंटरटेनमेंट अँड एज्युकेशनने ‘थर्ड आय’मार्फत यासाठी सल्लागार समिती नेमली. ही समिती चित्रपटांतील वैद्यकीय दृश्यांच्या अचूकतेसाठी मोफत सुविधा पुरवणार आहे.
फोटो - अमर, अकबर, अँथोनी चित्रपटातील एक दृश्य.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट, दीपा साही यांसारख्या मान्यवरांसह मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांचा समितीत समावेश आहे. अनेकदा दिग्दर्शकांना वैद्यकीय ज्ञान नसल्याने चित्रपटात चुकीच्या वैद्यकीय संकल्पना दाखवण्यात येतात. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचते. विशेषत: पूर्वीच्या चित्रपटांमध्ये अशा चुका व्हायच्या वा कथेची गरज म्हणून हेतुपुरस्सर केल्या जायच्या. मात्र यापुढे असे होऊ नये म्हणून थर्ड आयने ही समिती स्थापन केली आहे. या संस्थेकडे येणा-या प्रत्येक चित्रपटास वैद्यकीय अचूकतेबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

पुनरावृत्ती टळणार
‘अमर, अकबर, अँथनी’ या गाजलेल्या चित्रपटात रक्तदानाचे दृश्य आहे. यात अमर, अकबर, अँथनी या तिघांचे रक्त एकाच वेळी त्यांच्या आईला म्हणजे निरुपमा रॉयला एकाच सलाइनमधून देण्यात येते. वैद्यकीय शास्त्रानुसार हे दृश्य अत्यंत चुकीचे होते. अशी दृश्ये पुन्हा दाखवली जाऊ नयेत याकरिता आता ‘थर्ड आय’ची मदत चित्रपटांना हाईल.

हॉलीवूडच्या हेल्थ सोसायटीचा आदर्श
थर्ड आयने स्थापन केलेल्या समितीमागे हॉलीवूड हेल्थ सोसायटीची पार्श्वभूमी आहे. हॉलीवूडच्या प्रत्येक चित्रपटाला त्यातील वैद्यकीय दृश्ये हॉलीवूड हेल्थ सोसायटीकडून पडताळून घेणे अनिवार्य आहे. शिवाय वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित ग्रे अॅनॉटॉमीसारख्या मालिकांनाही या हेल्थ सोसायटीकडून परवानगी मिळाल्यानंतरच प्रक्षेपण टीव्हीवर करता आले.

अचूकता येण्यास मदत
चित्रपटाच्या इतर बाजूंवर अलीकडे खूप परिश्रम घेण्यात येतात. मात्र वैद्यकीय दृश्यांच्या अचूकतेबाबत फारसे कुणी पडताळून बघत नाही. त्यामुळे ‘थर्ड अाय’द्वारे चित्रपटांमध्ये अशी अचूकता येण्यास मदतच होणार असल्याचे समितीचे सदस्य, डॉ. निखिल दातार म्हणाले.