आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाक्षरीसाठी आलेल्यांना शशी माझे नाव विचारायचे, प्रेम चोप्रा यांनी जागवल्या आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शशी कपूर हा बॉलीवूडमधला एक अत्यंत संवेदनशील माणूस. आज मी माझा जिव्हाळ्याचा, संवेदनशील आणि अत्यंत विनोदी स्वभावाचा सख्खा मित्र गमावला आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांनी भावना व्यक्त केली आहे. शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांनी सुमारे १४ चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या होत्या.  प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या ‘प्रेम नाम है मेरा’ या आत्मचरित्रामध्ये शशी कपूर यांना एक संपूर्ण प्रकरण वाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रेम चाेप्रा यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...


‘शशी कपूरच्या निधनाने मला धक्काच बसला आहे. ते दीर्घकाळापासून आजारी असले तरी त्यांचे निधन माझ्यासाठी अकालीच आहे. आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले. त्यांनी १९५० मध्येच या चित्रपटांत बालकलाकाराच्या रुपात पदार्पण केले होते. १९६७ मध्ये ‘आमने सामने’ चित्रपटांत आम्ही पहिल्यांदा सोबत काम केले आणि आमच्यात जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यावेळी शशी कपूर यांना प्रचंड लोकप्रियता होती. मला जास्त ओळख नव्हतीच. शेकडो चाहते शशी कपूर यांच्याकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी यायचे. 


गंमत अशी की, शशी त्या चाहत्याच्या हातातील कागद हिसकून घ्यायचे आणि माझ्याकडे बोट दाखवून ‘हा माणूस कोण?’  अशी त्यांची फिरकी घ्यायचे.  आता ते चाहते बिचारे मला फक्त चेहऱ्यानेच ओळखायचे. चाहत्यांना माझे नाव प्रश्नच नव्हता. अशा गमती त्यांनी अनेकदा केल्या. पुढे मी चित्रिकरणावेळी मधूनच पळून जाऊन चाहत्यांना ऑटोग्राफ देऊन यायचो. 

 

प्रेम चाेप्रा- शशी यांचे  एकत्रित  चित्रपट
शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांनी आमने सामने, क्लर्क, इल्जाम, भवानी जंक्शन, घर एक मंदिर, सवाल, एक और एक ग्यारह, क्रांती, काला पत्थर, दो मुसाफिर, त्रिशूल, इमान धरम, जानेमन, वचन, एक श्रीमान एक श्रीमती आदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

 

‘त्रिशूल’च्या वेळी रात्रभर धिंगाणा
शशी, अमिताभ आणि मी ‘त्रिशूल’च्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत होतो. एका रात्री आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये  बसलो होतो. (तेव्हा अमिताभही मद्यपान करायचे.) शशीने रात्रभर सतारवादन केले. तिघांनी खूप मस्ती केली.  सकाळी ७ वाजता सेटवर पोहोचलो. तेव्हा यश चोप्रा म्हणाले होते की, ‘बघा, आमची पोरं वेळेची किती काटेकोर आहेत.’ त्यावर आम्ही तिघेही प्रचंड हसलो. 

 

एकदाच दोघांचाही जीवन गौरव
योगायोग म्हणजे, प्रेम चोप्रा आणि शशी कपूर यांना २०१५ मध्ये २७व्या पुणे चित्रपट महोत्सवात ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी तब्येतीच्या कारणावरून शशी कपूर प्रत्यक्ष समारंभात उपस्थित राहू शकले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...