रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या रेडिओ जॉकीच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन दिसणार आहे. 'तुम्हारी सुलू' असे तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या चित्रपटासाठी रिअल रेडिओ स्टेशनचा सेट बनवण्यात येणार असून त्यासाठी मुंबईतील टॉप समजल्या जाणाऱ्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक इमारत भाडोत्री घेण्यात आली आहे. त्याच्या टेरेसवर 16 हजार चौरस फुटांचे रेडिओ चॅनल ऑफिस साकारले जाणार आहे.
ऑफिसच्या सेटचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी 100 कारागीर गेल्या महिन्यापासून काम करत आहेत. या महिन्याच्या शेवटी चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात विद्या रेडिओ जॉकीच्या आयुष्यातील अदृष्य भावभावना व्यक्त करताना दिसणार आहे.
हा चित्रपट 1 डिसेंबर 2017 ला प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे याच तारखेला ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा '102 नॉट आऊट' हा चित्रपटही प्रदर्शित करण्यात येणार आहे.