आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajkumar Hirani Said There Is No Need Of Sensor Board

प्रेक्षक सूज्ञ, सेन्सॉर नकोच, राजकुमार हिराणींचे परखड मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपटात कोणती दृश्ये असावीत, तो कसा असावा यासाठी सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता नसून कोणता चित्रपट पाहायचा हे प्रेक्षक स्वतःच ठरवतील, असे स्पष्ट मत प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले. संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपटाची पटकथा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुन्नाभाई सिरीज, थ्री इडियट, पीके असे वेगवेगळ्या पठडीतील यशस्वी चित्रपट देणारे हिराणी आता महिला बॉक्सरच्या जीवनावरील "साला खडूस' चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाची निर्मितीही तेच करत आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुधा कोंगरा करीत आहेत. चित्रपटाबद्दल माहिती देताना हिराणी म्हणाले, महिला बॉक्सरचे जीवन कसे असते ते आजवर हिंदी चित्रपटात आलेले नाही. त्यामुळे जेव्हा आर. माधवन माझ्याकडे चित्रपटाची कथा घेऊन आला तेव्हा मी लगेच या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तयार झालो. कारण समाजात सकारात्मक संदेश देणे मला आवडते आणि हा चित्रपट तसाच आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यावर कशी मात करता येते ते आम्ही यात दाखवले आहे.

"मेरी कोम' चित्रपट याच विषयावर होता असे सांगताच हिराणी म्हणाले, हा चित्रपट आम्ही २०१३ मध्ये सुरू केला तेव्हा मी "पीके'च्या चित्रीकरणात व्यग्र होतो. त्यानंतर "मेरी कोम' आला. "पीके'बाबतही असेच झाले. आम्ही चित्रपट सुरू केला आणि "ओ माय गॉड' प्रदर्शित झाला. मात्र, ट्रीटमेंट वेगळी असल्याने आमचा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. "पीके'मधून तुम्ही हिंदू समाजावरच टीका केली असे म्हटले जाते. तुम्हाला काय वाटते? असे विचारले असता हिराणी म्हणाले, आम्ही हिंदुस्थानात राहातो. हिंदुस्थानात मंदिरांची संख्या जास्त आहेत. त्याचबरोबर खोट्या गुरूंची संख्याही कमी नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टींवरच आम्ही प्रहार केले. आम्ही मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील चुकीच्या गोष्टींवरही टीका केली आहे.

चर्च आणि मशिदींमधील चुकीच्या गोष्टींवर चित्रपट आलेले आहेत. पाकिस्तानात "खुदा के लिए' तयार झाला होता. या चित्रपटात मशिदीतील चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढलेले आहेत. "द मॅल व्हू सूड गॉड' नावाचा ऑस्ट्रेलियन चित्रपट आहे, ज्यात चर्चेसमधील चुकीच्या गोष्टींवर कठोर प्रहार करण्यात आले आहेत. ज्या व्यक्ती चांगल्या आहेत त्यांनी याची प्रशंसा केली, मात्र जे भंपक आहेत त्यांनीच याचा विरोध केला.

मुन्नाभाई सिरीजचा सिनेमाही येणार
संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपटाचे काम कुठवर आले आहे? या चित्रपटाची पटकथा तयार झाली असून मुख्य नायक म्हणून रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे. अन्य कलाकारांची निवड लवकरच करण्यात येईल. त्यानंतर मुन्नाभाई सिरीजमधील नव्या चित्रपटाचे काम हाती घेण्यात येईल, असेही राजकुमार हिराणी यांनी सांगितले. मात्र, यातील कलाकार गुलदस्त्यात आहेत.