आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वी थिएटर : शशी कपूर यांच्या नाट्यप्रेमाचे वास्तव रूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शशी कपूर यांच्या चित्रपटांतील योगदानाबद्दल नेहमीच बोलले जाते, पण रंगभूमी समृद्ध व्हावी म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले त्याविषयी सांगणे आवश्यक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्याकडून राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या तिन्ही मुलांना चित्रपट व नाटकाचा सांस्कृतिक वारसा मिळाला. त्यापैकी राज व शम्मी हे चित्रपटांमध्येच जास्त रमले. मात्र, शशी कपूर यांनी चित्रपट व नाटक या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले.  

 

पृथ्वीराज कपूर यांनी अनेक त्रपटांत काम केलेले असले तरी त्यांचे पहिले प्रेम नाटकांवर होते. त्यामुळे १९४४ मध्ये पृथ्वी थिएटर ही नाटक कंपनी स्थापन केली. ही कंपनी दौरे काढून नाटक करत असे. पृथ्वी थिएटर नाटक कंपनी १६ वर्षे चालली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशातील युवकांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारी नाटके पृथ्वीराज कपूर सादर करत असत. त्याचबरोबर हिंदू व मुस्लिम यांच्यात बंधुभाव नांदावा म्हणून पृथ्वीराज कपूर यांनी सादर केलेल्या पठाण या नाटकाचे शेकडो प्रयोग तेव्हा झाले होते. पण १९४०च्या दशकातच चित्रपटांचा इतका बोलबाला सुरू झाला की, नाटक कंपन्यांचे वैभवाचे दिवस ओसरू लागले. त्यामुळे अखेर पृथ्वी थिएटर ही नाटक कंपनी बंद करून पृथ्वीराज कपूर यांनी सारे लक्ष चित्रपटांवर केंद्रित केले.  


आपल्या पृथ्वी थिएटर या नाटक मंडळीला हक्काची वास्तू हवी, असे पृथ्वीराज कपूर यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १९६२ मध्ये जुहू येथील एक प्लॉट लीजवर घेतला होता व तिथे ते एक तात्पुरता रंगमंचही उभारला होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे पृथ्वीराज कपूर यांना पृथ्वी थिएटरची कायमस्वरूपी वास्तू उभारण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे शक्य झाले नाही. २९ मे १९७२ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेमके काय करावे, असा विचार कपूर मंडळी करत होती. ज्या वर्षी पृथ्वीराज यांचे निधन झाले त्याच वर्षी नेमके त्यांनी थिएटर बांधण्यासाठी घेतलेल्या प्लॉटच्या लीजची मुदत संपत होती. जुहू येथील तो प्लॉट कपूर घराण्यातील लोक विकत घेतील का? अशी विचारणा झाल्यानंतर शशी कपूर व जेनिफर कपूर पुढे आले. पृथ्वीराज कपूर यांचे थिएटर बांधायचे स्वप्न आपण पूर्ण करायचे, असा मनाशी निर्धार करून तो प्लॉट शशी कपूर यांनी विकत घेतला.  


वेद सेगन या वास्तुविशारदाने रंगभूमीच्या साऱ्या गरजा लक्षात घेऊन पृथ्वी थिएटरच्या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यानुसार जुहूत पृथ्वी थिएटरची वास्तू बांधली. या थिएटरच्या वास्तूच्या बांधणीवर जेनिफर बारीक लक्ष ठेवून होत्या. ५ नोव्हेंबर १९७८ पासून पृथ्वी थिएटरची वास्तू रंगभूमीच्या सेवेत रुजू झाली. नाट्यधर्मींच्या सेवेसाठी नुसते थिएटर बांधले म्हणजे आपले उत्तरदायित्व पूर्ण झाले, असे मानणाऱ्यांतले शशी व जेनिफर दोघेही नव्हते. या थिएटरमध्ये रंगभूमीला पोषक ठरतील असे नवेनवे प्रयोग होत राहिले पाहिजेत ही जाणीव पहिल्यापासून या दोघांनी तेथे कार्यरत असणाऱ्या लोकांमध्ये रुजवली. त्यासाठी पृथ्वीराज कपूर मेमोरियल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून हिंदी नाटके व परफॉर्मिंग आर्टला जास्तीत जास्त लोकांसमोर नेण्याचा उद्देश शशी कपूर व जेनिफरने ठेवला. हे काम पृथ्वी थिएटरमार्फत त्यांनी जोमाने केले. 


जेनिफर कपूर यांनी पृथ्वी थिएटरच्या संचालनात संपूर्ण लक्ष घातले होते. १९८४ सालापर्यंत त्यांनी या थिएटरच्या विश्वस्त म्हणून काम पाहिले, तर शशी कपूर हे व्यवस्थापकीय संचालक होते. पण जेनिफर यांच्या निधनानंतर थिएटरचे दैनंदिन कामकाज त्यांचा मुलगा कुणाल व संजना पाहू लागले.


१९९०च्या सुरुवातीला शशी व जेनिफर कपूर यांची मुलगी संजना हिने पृथ्वी थिएटरच्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली. अर्थात तिला शशी कपूर यांचे मार्गदर्शन लाभत होतेच. त्यातूनच संजना कपूरने पृथ्वी प्लेअर्स व लिटल पृथ्वी थिएटर्स (बालरंगभूमीिवषयक उपक्रम) असे उपक्रम सुरू केले. पृथ्वी थिएटरच्या कार्याची दखल घेऊन सरकारने विशेष टपाल तिकीटही काढले. आज पृथ्वी थिएटरमध्ये दरवर्षी विविध नाटकांचे ५४० शोज होतात. तेथील नाट्यमहोत्सवात  मराठी नाटकेही होतात. विविध भाषांतील रंगभूमीवरचे प्रवाह आपल्या रंगमंचावर यावेत यासाठी पृथ्वी थिएटरचे संचालक धडपडत असतात. त्यांना ही दूरदृष्टी मिळाली शशी व जेनिफरमुळे. 


इंग्रजीचा बाेलबाला असताना हिंदीला मदत
पृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उद्ध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रूपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते. त्यानंतर इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनने (इप्टा) सादर केलेले व एम. एस. सत्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बकरी’ या हिंदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. पृथ्वी थिएटरने स्थापनेपासूनच नेहमीच वेगळ्या धाटणीच्या व प्रयोगशील नाटकांना प्रोत्साहन दिले आहे. हे थिएटर सुरू झाले त्या वेळी मराठी रंगभूमीवरही प्रयोगशील प्रवाह वाहतच होते. पण मुंबईत इंग्रजी नाटकांचा दक्षिण मुंबई परिसरात जास्त बोलबाला होता. गुजराती रंगभूमीवर फार्सनी धुमाकूळ घातला होता. यातून वेगळी वाट काढून पृथ्वी थिएटरने हिंदी नाटकांना सक्रिय मदत केली. 

 


paranjapesamir@gmail.com 

 

 

पुढील स्‍लाइडवर... जेनिफरच्या निधनाच्या दिवशीही  झाले प्रयोग

बातम्या आणखी आहेत...