सारा अली खान, जान्हवी कपूर, आहान शेट्टी, इशान खट्टर हे सगळेच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रांग लावून उभे आहेत. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते आहे मिजान जाफरीचे. मिजान जावेद जाफरी यांचा मुलगा विनोदवीर जगदीप यांचा नातू आहे.
संजय लीला भन्साळी मिजान जाफरीला लाँच करणार आहेत. भन्साळी त्याच्यासाठी आपल्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये चित्रपट बनवणार आहेत. मिजान याने 'बाजीराव मस्तानी'मध्ये भन्साळी यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. वडिलांसारखाच तो एक चांगला डान्सरदेखील आहे. त्याने न्यूयॉर्कमधून फिल्म मेकिंगचा कोर्सदेखील केला आहे.
भन्साळी आपल्या भाचीसोबत मिजानला लाँच करणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. त्यावेळी या दोघांचा चित्रपट भन्साळी नव्हे तर त्यांचे सहायक दिग्दर्शक मंगेश हडवाले करणार होते, अशीही चर्चा होती. हा चित्रपट एका लव्ह स्टोरीवर आधारित असेल, सध्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. भन्साळी यांची भाची त्यांची बहीण बेला सहेगल यांची मुलगी आहे. बेलाने अनेक चित्रपटात एडिटर म्हणून काम केले आहे.
अमिताभ बच्चन यांची नात नव्यासोबत मिजान नुकताच दिसला होता. यावरुन तो चर्चेत आला होता. खरं तर, तो नव्यासोबत चित्रपट पाहण्यास गेला होता. तेव्हा तो फोटोग्राफर्सच्या नजरेस पडला. मात्र त्याने आपले तोंड लपवले होते. अनेक छायाचित्रातही त्याचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता.