आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाबुजी धीरे चलना\' फेम ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन, जॉनी वॉकर यांची होती मेहुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - सीआयडी, आरपार, रेशमी रुमाल, श्रीमान सत्यवादी अशा एकाहून एक सरस कृष्णधवल हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या प्रख्यात अभिनेत्री शकिला यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. माहिम येथील दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.  “बाबूजी धीरे चलना’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे व त्यांच्या भूमिकाही चित्रपट रसिकांच्या मर्मबंधातली ठेव होती.   

शकिला या निधनसमयी ८२ वर्षांच्या होत्या. शकिला यांचे भाचे व प्रख्यात अभिनेता जॉनी वॉकर यांचे पुत्र नासीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार शकिला या वृद्धपकाळामुळे काही आजारांनी त्रस्त होत्या. त्यांना किडनीचा विकार तसेच मधुमेहही होता. त्यांना हृदयविकाराचाही त्रास सुरू झाला होता.   

शकिला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला होता. गुरुदत्त यांच्या आरपार व सीआयडी या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. शक्ती सामंता यांच्या चायना टाऊन या चित्रपटात शम्मी कपूर यांच्या सोबत शकिला यांनी भूमिका केली होती. पोस्ट बॉक्स ९९९ या चित्रपटातील शकिला यांची अदाकारी लाजवाब होती. त्यांनी १९६३ साली चित्रपट संन्यास घेतला. शकिला या जॉनी बार्बर या गृहस्थाशी विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर त्या आपल्या पतीबरोबर लंडन येथे गेल्या. जॉनी बार्बर यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. शकिला यांना मीनाझ नावाची एक मुलगी होती. मीनाझचे १९९१ साली निधन झाले होते. मनोजकुमार, राज कपूर, देव आनंद, सुनील दत्त या अभिनेत्यांबरोबरही शकिला यांनी विविध चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. आरपार चित्रपटातील बाबूजी धीरे चलना, आँखो ही आँखो मे इशारा हो गया (सीआयडी), लेके पहेला पहेला प्यार (सीआयडी), ही गाणी रसिकांच्या मर्मबंधातली ठेव आहेत.   

बहिणीचे जॉनी वॉकरशी लग्न :   शकिला यांची लहान बहीण नुरजहाँ यांना जॉनी वॉकर एका चित्रपटाच्या सेटवर भेटले. नुरजहाँ व जॉनी वॉकर यांचे एकमेकांवर प्रेम जडले व कालांतराने ते दोघेही विवाहबद्ध झाले.    
 
शकिला यांचे चित्रपट    
दुनिया (१९४९), दास्तान (१९५०), अरमान (१९५३), मदमस्त (१९५३), शहनशाह (१९५३), आगोश (१९५३), आरपार, दान, हल्लागुल्ला, गुलबहार, खुशबू, लैला, लाल परी, अलिबाबा ४० चोर, नूरमहल (१९५४), मस्त कलंदर, रत्नमंजरी (१९५५), सीआयडी, कारवाँ, हातीमताई, झाँसी की रानी, मलिका, पैसा ही पैसा, रुपकुमारी (१९५६), बेगुनाह, नागपद्मिनी, परिस्तान, आग्रा रोड (१९५७), अल हिलाल, चौबीस घंटे, पोस्ट बॉक्स नं. ९९९ (१९५८), फोर्टी डेज, गेस्ट हाऊस, काली टोपी लाल रुमाल, स्कूल मास्टर (१९५९), हे आणि इतर त्यांचे चित्रपट गाजले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, शकिला यांचे काही PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...