मुंबई- अभिनेता आमिर खानच्या असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून देशभरात एकच चर्चा सुरू असताना आमिर लुधियाना येथे "दंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. मात्र, चार दिवसांचे चित्रीकरण असतानाही तो गुरुवारी मुंबईत दाखल झाला. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात आमिरने सध्याच्या देशातील असहिष्णुतेच्या मुद्द्यावर वक्तव्य करताना आपली पत्नी किरण हिने एकदा देश सोडून जाण्याबाबत सांगितले होते, असे म्हटले होते. त्यानंतर सर्व स्तरांतून त्याच्यावर टीका झाली. तसेच त्याच्या घराबाहेर अनेकांनी निदर्शने केली होती. नीरज पांडे दिग्दर्शित "दंगल' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आमिर लुधियाना येथे गेला होता. मात्र, चार दिवसांचे चित्रीकरण असतानाही तो गुरुवारी मुंबईत परतला. सूत्रांनुसार, आमिर विमानतळावरून थेट वांद्र्यातील घरी पोहोचला. तिथे आधीच माध्यमांचे प्रतिनिधी होते. मात्र, त्याने संवाद साधला नाही. तो शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.