चेन्नईः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी 'ताकद' विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. पण यावर स्पष्टीकरण देताना आपण 'ताकद' शब्दाचा प्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करु शकतात रजनीकांत... रजनींकात स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करतील असे अंदाज लावले जात आहेत. यासाठी दक्षिण भारतात पोहचण्याचा प्रयत्न करु पाहणा-या भाजपाची साथ त्यांना मिळू शकते. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरील अनेकांनी याचा संबंध
जयललितांच्या निधनाशी जोडला असून त्यामुळेच ते नाराज असल्याचा दावा केला आहे. तामिळनाडूत जयललिता यांच्यानंतर चिनम्मा यांचे राज्य असणार असून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीतून राज्याला वाचवण्याचे आवाहन केले आहे.
भाजपकडून रजनीकांत यांना घातली जातेय समजूत...
खरं तर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीनंतरही रजनीकांत राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रजनीकांत यांनी यासाठी नकार दिला होता. तामिळनाडूत प्रवेश करण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यासाठी रजनीकांत यांचा होकार मिळवण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. जयललिता यांच्या निधनानंतर या प्रयत्नांना जोर आला असल्याचे सुत्रांकडून कळले आहे.
'ताकद' शब्दप्रयोग अध्यात्माविषयी केला...
रजनीकांत यांनी मात्र आपण 'ताकद' शब्दप्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचे स्पष्ट केले आहे. 'जर प्रसिद्धी आणि पैशाला एकीकडे ठेवून, तुम्ही अध्यात्माशी जोडले जाणार का? असा सवाल मला कोणी विचारला, तर मी अध्यात्म निवडेन. कारण अध्यात्मात ताकद आहे. चुकीचं समजू नका पण मला ताकद आवडते,' असे रजनीकांत बोलले आहेत.