आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Updates About 46th International Film Festival Of India

46th IFFI : कलाकारांना नाकारण्यात आला प्रवेश, दिलीप प्रभावळकरांनाही बसली झळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अँटिनीओ'  या चित्रपटातील एक दृश्य - Divya Marathi
'अँटिनीओ' या चित्रपटातील एक दृश्य
'गोव्यात 46 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) सुरू झाला असून या महोत्सवातील घडामोडी, चर्चासत्रे व रसिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चित्रपट समीक्षक व अभ्यासक शशिकांत सावंत देत आहेत…
एक सिनेमा आपण पाहतो आणि त्याच सिनेमाचा दिग्दर्शक आपल्याला भेटतो कधी पत्रकार परिषदेत तर कधी पत्रकार परिषदेबाहेर. आपल्याला बरंच काही विचारायचं असतं, समजून घ्यायचं असतं आणि साक्षात दिग्दर्शक, आपल्या समोर असतो. तोही ३ ते ४ हजार किलोमीटर अंतर पार करून आलेला असतो. आजच्या पत्रकार परिषदेत 'अँटिनीओ' हा चित्रपट बनवणारा फर्डीमनँडो फ्लोमानिरो होता. त्याच्याबरोबर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि अमेरिकेतील दिग्दर्शकही होते. सकाळी ८.३० ला 'अँटिनीओ' हा चित्रपट दाखवण्यात आला. तो एका कवियित्रीच्या जीवनावर आधारित होता. जी वयाच्या २६ व्या वर्षी मरण पावली. ही इटालिअन कवियित्री कविता लिहित होती तेव्हा इटलीमध्ये फॅसिझम चालू होता. तिचे वडील अत्यंत आक्रमक आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे होते. अत्यंत नाजूक आणि तरल मनाच्या या कवियित्रीच्या कविता ती जिवंत असताना कधीच प्रसिद्ध झाल्या नाहीत. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी तिचे कविता संग्रह प्रसिद्ध केले.
टिपिकल बायोपिक (चरित्रपर) पद्धतीने तिच्या आयुष्यातील घटना दिग्दर्शकाने मांडल्या नव्हत्या. लहाणपणी कविता शिकणारी ग्रीक, रोमन साहित्य अभ्यासणारी ती तरुणी मोठी होते तेव्हा विलक्षण अस्वस्थपणे शरीर बिछान्यावर झोकून देऊन तळमळत राहते. ही अस्वस्थता दिग्दर्शकाने खूप धाडसाने तिचे न्यूड चित्रण टिपले होती. साहजिकच पत्रकार परिषदेत इरॉटिक आणि कलात्मक यातील सीमारेषा कोणती यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दिग्दर्शक म्हणाला, ‘मी अशी सीमारेषा मानत नाही. मला टिपिकल पद्धतीने चरित्रपटात दाखवतात तसे तिच्या आयुष्यातले प्रसंग क्रमाक्रमाने मांडायचे नव्हते तर मला एका कवीचा प्रवास दाखवायचा होता.’ नंतर त्याने असेही सांगितले की, त्या काळात फॅसिजमचा प्रचंड प्रभाव इटलीमध्ये होता. जरी मी हे चित्रपटात प्रत्यक्ष दाखवले नसेल तरी तिच्या वडिलांच्या रुपाने त्या काळाचे चित्रण केलेले आहे. पुढे तो म्हणाला की, नवीन हुकुमशाही राजवटीमुळे इटाली हा देश २५ वर्ष मागे गेला. यामुळे साध्या, सरळ कथा सांगणेही कठीण होऊन बसले आहे.
माझ्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे साधारणपणे सिनेमाचे नायक-नायिका हे असे असतात की ज्यांचे काम दाखवता येते. उदा. चित्रकार, सुतार हे काय करतात हे दाखवता येते. पण लेखक, कवी हे कसे काम करतात हे दाखवता येत नाही. त्यामुळे पुस्तकाची सिनेमा थिअरी सांगते की व्यक्तिरेखा निवडाल तेव्हा लेखक, लेखिका निवडू नका, असे असतानाही त्याने एका कवियित्रिचे चित्रण का केले? या प्रश्नावर तो म्हणाला, ‘हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि मला आव्हानात्मक स्टोरी निवडायची होती.’ कवितेचा जन्म किंवा तळमळ ही वेगळ्या प्रकारे दाखवायची होती. प्रत्यक्ष सिनेमात ही कवियित्री आल्प्स पर्वतावर माऊंटनेरींग करायला जाते असे अंगावर काटा आणणारे दृश्य आहे. ती आणि तिचा मित्र खडकाळ डोंगरावर हातापाय रोवत आणि तिथे गिर्यारोहणासाठी लागणारे खिळे ठोकत वरवर जातात आणि ती डोंगरमाथ्यावर विसावते. याप्रकारे कलावंताचा संघर्ष त्याने रुपकात्मक रुपाने दाखवला होता. सिनेमात असे अनेक प्रसंग होते ज्यामध्ये दृश्य दिसत नाही पण आवाज ऐकू येतात. तरुण वयातील तळमळ दाखवताना अभिनेत्रीच्या देहबोलीचा त्याने सुंदर वापर करुन घेतला होता. त्याच्या जोडीला श्रीलंकन तसेच अमेरिकन चित्रपट दिग्दर्शकही होता. या साऱ्यांनाच नव्या तंत्रज्ञानामुळे काय सोपे आणि काय कठीण झाले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सर्वांनीच म्हटले की नव्या तंत्रज्ञानामुळे चित्रपट बनवण्याचे तंत्र स्वस्त झाले आहे. ज्याचा परिणाम म्हणून चित्रपटांच्या संख्येत खूप वाढ झालेली आहे. शिवाय अनेकदा शूटींग करताना विशेषत: जुन्या काळाच चित्रण करताना आधुनिक टेलिफोन वायर्स किंवा अँटीनासारख्या गोष्टी दिसत राहतात. डिजीटल तंत्रज्ञानात शूटींग नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये पुसून टाकण्यात येतात.
इफ्फीमध्ये निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यासाठी असलेला फिल्म बाजार आता संपला. या फिल्म बाजारसाठी १२ हजार रुपये घेतले जातात. पण अनेकांना तो उपयुक्त ठरतो. फिल्म बजार संपल्यावर ही सारी मंडळी इफ्फीमधील सिनेमा पाहायला आली. तेव्हा या साऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. खरे तर, फिल्म बाजारवाल्यांच्या कार्डवर आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर असे लिहिलेले होते. तरीही प्रवेश नाकारल्यामुळे प्रतिनिधी चिडलेले आहेत. यात अनेक सेलिब्रेटींचाही समावेश आहे. दिलीप प्रभावळकरांसारख्या नामवंत अभिनेत्यालाही याची झळ लागली.
अर्थात असे काही प्रसंग वगळता प्रतिनिधी २ कारणांमुळे खूश आहेत. एकतर ऑनलाईन तिकीट बुकींग बंद केल्यामुळे सर्वांनाच रांगेत राहून तिकीटे काढावी लागतात. गेली २-३ वर्ष ऑनलाईन बुकींगमुळे लॅपटॉप, स्मार्ट फोन किंवा तंत्रज्ञान न वापरणाऱ्या ४०-५० वयस्क प्रतिनिधींची खूपच पंचाईत झालेली होती. यावर्षी उपस्थिती कमी असल्यामुळे बहुतेक चित्रपटांत सुरळीत प्रवेश मिळतो आहे. प्रतिनिधींच्या मागणीला मान देऊन ज्या चित्रपटांचा दुसरा शो हाऊस फुल झाला अशा ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटांचा तिसराही शो ठेवण्यात आलेला आहे. अर्थात असेही असले तरी वेगवेगळ्या कारणाने कुठेकुठे नाराजी दिसतेच. पण शेवटी, म्हटले आहे ना, सर्व लोकांना एकाचवेळी खूश करणे हे फारच कठीण असते.