आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे आज (4 डिसेंबर) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शशी कपूर गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही मुले आहेत. 2014 मध्ये त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. 1984 मध्ये पत्नी जेनिफरचा कर्करोगाने मृत्यू झाल्यामुळे शशी खचून गेले. बिघडत्या प्रकृतीमुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून सन्यांस घेतला होता. अखेरची काही वर्षे ते व्हिलचेअरवरुन वावरत होते.

 

> भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. सार्थक चित्रपटांमधील त्यांचे योगदान आणि भारतीय रंगमंचाला शक्ती देण्याची त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम स्मरणात राहील.’
- रामनाथ काेविंद, राष्ट्रपती

 

> शशी कपूर यांचा अभिनय चित्रपटांसोबतच नाटकांमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्यांनी अभिनय एका वेगळ्या स्तरावर नेला होता. त्यांचा अभिनय नवी तरुण पिढी नेहमीच लक्षात ठेवेल.
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

 

कालखंडाचा साक्षीदार हरपला

‘शशी कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीसाठी लक्षणीय असे योगदान राहिले आहे.  आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळ गाजवला. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीबद्दल आपली निष्ठा आणि बांधिलकी जपली. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका महत्त्वपूर्ण कालखंडाचा साक्षीदार पडद्याआड गेला.’
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल

 

हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व हरपले

आपल्या सशक्त अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ रूपेरी पडदा गाजवणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या शशी कपूर यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली होती. पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून अभिनयाचा सुरू झालेला त्यांचा प्रवास हिंदी चित्रपटसृष्टीत चौफेर विस्तारला. भावनांचे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या शशी कपूर यांनी हिंदीसोबतच इंग्रजी चित्रपटांमध्येही आपले योगदान दिले. नावीन्य आणि उत्कटता हा त्यांच्या अभिनयाचा केवळ भाग नव्हता, तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा गुण होता.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

अदबशीर, सज्जन व्यक्तिमत्त्व 

शशी कपूर यांच्या निधनामुळे आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीवर वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते आपण गमावले आहेत. शशी कपूर नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा, घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी अशा विविध भूमिकांतून ते रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहतील.
- विनोद तावडे, सांस्कृ.कार्य मंत्री

 

शशी कपूर यांचा अल्पपरिचय... 

> शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. 1948 साली आलेल्या ‘आग’ आणि 1951 साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. 
> हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले. 
> तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली.
> 1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 'जब जब फूल खिले' या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत. 

> जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. 
> त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.
> दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं. 
> शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. 
> शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमँटिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत. 
> हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले.
> अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग 36 चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली. 
> हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. 
> आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली. 
> शशी कपूर यांना 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. 
> सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
> 160 चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

 

शशी यांची शिस्त इतकी होती की कुटुंंबीय ‘अंग्रेज कपूर’ नावाने बोलवायचे, मेहनती इतके की राज यांनी ‘टॅक्सी कपूर’ नाव दिले

पडद्यापल्याडही शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. अवघे कपूर घराणे त्यांना ‘अंग्रेज कपूर’ नावाने पुकारायचे. कारण शशी यांचे शिस्तबद्ध जीवन. ते दिवसभरात १५ ते १८ तास शूटिंग करायचे. यामुळेच राज कपूर त्यांना ‘टॅक्सी कपूर’ नावाने बोलवायचे.  शिखरावर असताना त्यांनी वेगळ्या पठडीतील चित्रपटांच्या निर्मितीची योजना आखली. यासाठी श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड यांना भेटले. शशी व्हिस्कीचे शौकीन, तर बेनेगल आदी मंडळी व्होडका प्यायची. यामुळे तेही व्होडका पिऊ लागले. मी ज्यांच्यासोबत काम करतोय त्यांच्या व माझ्यात समानतेची भावना असावी, हे कारण त्यामागे होते. त्यांनी जुहूत पृथ्वी थिएटर पुन्हा उभारले.नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर अादी कलाकार येथूनच उदयास आले. शशी एके दिवशी ‘पाप और पुण्य’च्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. तेथे एक उंच मुलगा हातात भाला घेऊन उभा असल्याचे दिसले. ते अमिताभ बच्चन होते. त्या काळात ते धडपडत होते. शशींनी त्यांना बोलावले.  म्हणाले- ‘तुम्ही चांगले अभिनेते आहात. फुटकळ कामे करू नका. सध्या तुम्ही स्ट्रगल करत आहात. शक्यतो तुमच्याकडे पैसे नसतील. असे असेल तर माझ्या कार्यालयात या. अडचणी सोडवू.’ येथूनच त्यांची मैत्री जुळली. पुढे दोघांनी अनेक चित्रपट केले. अनेक चित्रपट निर्मात्यांनाही शशी यांनी मदत केली.


आज शशी कपूर आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून ते कायम चाहत्यांच्या मनात राहतील. पाहुयात, शशी कपूर यांची कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबतची निवडक छायाचित्रे... 

 

 हेही वाचा..

>  शशी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावरुन दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

> शशी कपूर नव्हते खरे नाव, आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये झळकणारे पहिले भारतीय अभिनेते

Rare Pics: आता उरल्या फक्त आठवणी... शशी कपूर यांच्या हस्यात होती जादू, लोक व्हायचे आकर्षित

> पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते शशी कपूर, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाविषयी सर्वकाही

>  शशी कपूर यांनी केले विदेशी तरुणीसोबत लग्न, या आहेत कपूर परिवारातील सूना PHOTOS

पृथ्वी थिएटर : शशी कपूर यांच्या नाट्यप्रेमाचे वास्तव रूप

प्रसन्न, प्रफुल्लित ‘शशि’मय गाणी

स्वाक्षरीसाठी आलेल्यांना शशी माझे नाव विचारायचे, प्रेम चोप्रा यांनी जागवल्या आठवणी

रंग वेगळा

कलात्मकतेकडे ओढा

 

 

बातम्या आणखी आहेत...