आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅलीवूडमध्ये कामासाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; अॅडगुरू देणार कौशल्य विकासाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चित्रपट क्षेत्रात विविध भागांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. दिग्दर्शन, संपादन, फोटोग्राफी, अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. परंतु सहायक, क्रेन ऑपरेटर, लाइट सहायक अशा पदांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे ओळखीपाळखीनेच ही कामे दिली जातात. मात्र आता पंतप्रधानांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. प्रख्यात अॅडगुरू प्रल्हाद कक्कर हे प्रशिक्षण देण्यास तयार झाले असून एक महिन्यात याबाबतचा एमओयू केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

प्रल्हाद कक्कर यांना विचारले असता त्यांनी प्रशिक्षण देणार असल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले, बॉलीवूडचा व्यवसाय कोट्यवधींचा आहे. या ठिकाणी काही ठरावीक विभाग सोडले तर प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. अप्रशिक्षित व्यक्तीही चांगली कमाई करते. मात्र मुलांना या क्षेत्राचे प्रशिक्षण दिले तर त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल आणि बॉलीवूडलाही कुशल मनुष्यबळ मिळेल यासाठी आम्ही योजना तयार केली आहे. योजनेबाबत माहिती देताना कक्कर म्हणाले, बॉलीवूडमध्ये चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण रोजच असते. प्रत्येक युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यक्तींची आवश्यकता भासते. दिग्दर्शन, संपादन, अभिनय, लेखन हे विभाग सोडले तर लाइट अटेंडंट, कॅमेरा अटेंडंट, लहानसहान कामे करणारे बॉइज, मेकअप सहायक म्हणून प्रशिक्षित व्यक्ती नसतात.

दहावी पास विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून नंतर नोकरीही दिली जाणार आहे. यासाठी सुभाष घईही पुढे सरसावले असून त्यांच्या फिल्मसिटीत असलेल्या व्हिसलिंग वुड्समध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणेही सोपे होईल, असेही कक्कर यांनी सांगितले.
कशी होणार निवड?
राज्य सरकार जाहिरात देऊन या क्षेत्रासाठी काम करण्यास उत्सुक असलेल्या दहावी पास विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवणार आहे. त्यानंतर सरकार प्रल्हाद कक्कर ५० मुलांची निवड करतील. या मुलांना व्हिसलिंग वुड्समध्ये त्यांच्या आवडत्या विभागाचे सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर प्रमाणपत्र आणि सोबतच नोकरीही दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी करण जोहर, एकता कपूर अशा नामवंत निर्मात्यांशी करार केला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...