आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला कोणताच धोका नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी संघटना जमातउददावाचा म्होरक्या हाफिज सईदने शाहरुख खानला पाकिस्तानात स्थायिक होण्याचे निमंत्रण दिले आहे, कारण शाहरुखच्या एका वक्तव्याचा ‘मी भारतात सुरक्षित नाही’ असा चुकीचा अर्थ त्याने काढला. खरं तर शाहरुखने असे वक्तव्य केलेच नाही. त्याचे एवढेच म्हणणे होते की, ‘कधीकधी ज्यांची सहानूभूती पाकिस्तानसोबत आहे अशा मुस्लिमांचे मला प्रतीक मानले जाते.’ शाहरुखने आपल्या मायदेशी परत जावे, अशा अफवादेखील पसरवण्यात आल्या आहेत. शाहरुखच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता. अशाच प्रकारच्या काही बिनबुडाच्या अफवा एकेकाळी दिलीप कुमारबाबतीतही पसरवण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या घरात ट्रान्समीटर सापडल्याचेदेखील सांगण्यात आले होते. खरे म्हणजे त्या काळात त्यांच्या घरात ट्रान्झिस्टर सुद्धा नव्हता.

पाकिस्तान अत्यंत असुरक्षित देश असल्याचे हाफिजला माहीत आहे. पाकिस्तानात जवळपास दररोज एक जण दुसर्‍यावर आक्रमण करत आहे आणि मुस्लिम समाज अनेक गटांमध्ये विभागल्या गेला आहे. भारतात तर एक वादग्रस्त वास्तू तुटली आहे, परंतु पाकिस्तानात अनेक पाक इमारती दहशतवादाच्या शिकार बनल्या आहेत. खरे म्हणजे पाकिस्तानपेक्षाही जास्त मुस्लिम बांधव भारतात आहेत आणि येथे सर्व जातीचे लोक सारखेच सुरक्षित आहेत. वास्तविक वर्तमान कालखंडात कोणीच सुरक्षित नाही. हवेतील प्रदूषण, अन्नातील भेसळ आणि रस्ते अपघातातदेखील लोकांचा मृत्यू होत आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी मोठी आर्थिक विषमता आहे, परंतु भारताच्या आर्थिक विषमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त विषमता पाकिस्तानात आहे. आर्थिक विषमता हिंसाचार आणि गुन्ह्यांना जन्म देते. पाकिस्तानात फक्त हाफिज सईद आणि दाउद इब्राहिम अत्यंत सुरक्षित असावेत.

भारतातील एक लहान वर्ग मुस्लिम बांधवांचा तिरस्कार करतो, हे खरे आहे, कारण सध्याचा मुस्लिम समुदाय तैमूर आणि महमूद गझनवी यांचे नातेवाईक असल्याचे त्यांना वाटते. तथापि, गझनवी येण्याच्या अनेक दशकांनंतर बाबर भारतात आला होता. तसेच लूट न करण्याचे सांगत त्याने ‘मी भारतात स्थायिक होण्यास आलो आहे’, असे आपल्या सैन्याला सांगितले होते. दीर्घ काळापर्यंत अमेरिकेत दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या निग्रो लोकांच्या विरोधात संघटित हिंसाचार झालेला आहे. रेड इंडियन्स विरोधातही हिंसाचार झाला आहे. खरे म्हणजे जगातील सर्वच देशांमध्ये धर्म, रंग आणि जातीच्या नावावर भेदभाव होत आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात युद्धही झालेले आहेत. लिंकन यांनी तर समानतेसाठी अमेरिकेत भीषण गृहयुद्धदेखील लढले होते.

जगातील सर्वच देशांमध्ये इतर ठिकाणांहून आलेले लोक स्थायिक झाले आणि त्यांना नागरिकत्त्वदेखील बहाल करण्यात आले. अमेरिकन सिनेट आणि इंग्लंडच्या संसदेत भारतीय नागरिक निवडून गेले आहेत. वर्णद्वेष आता कोणीही पाळत नाही. सध्याच्या काळात केवळ तुमचे कामच सर्वकाही सांगते. खरी वैचारिक आधुनिकता सर्व संकीर्णतेला बाद करते. मात्र, हाफिज सईद व त्याच्यासारख्या अनेक लोकांच्या अवचेतनात जमिनदोस्त झालेल्या पुरातन इमारतींचे ढीगारे पडले आहे. तसेच हे लोक भलेही सीमेच्या कोणत्याही बाजूला असतील किंवा कोणत्याही समुदायाचे असतील तरी ते जगाचे रूपांतर ढिगार्‍यात करू पाहत आहेत. आज चीनमधील तरुणाई तळघरांमध्ये रॉक बँड वाजवते आणि व्यवस्थेचा विरोध करते. ते गांधीजींना आपला प्रेरणास्रोत मानतात आणि त्यांच्या पत्रिकेच्या मुखपृष्ठावर गांधीजींचे छायाचित्रदेखील असते. त्याचप्रमाणे पाकिस्तानातही रॉक बँड आहे. येथील तरुणाई जीन्स घालते आणि त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. पाकिस्तानातील नागरिकांमध्ये भारतीय चित्रपटांबद्दल प्रचंड वेड आहे. तसेच भारतीय चित्रपटांच्या जेवढय़ा अवैध सीडीज पाकिस्तानात विकल्या जातात तेवढय़ा भारतातही विकल्या जात नाहीत. हाफिज सईदने भारतीय चित्रपटांबद्दलचा पकिस्तानी नागरिकांचा वेडेपणा थांबवून दाखवावा. लता मंगेशकर यांची गाणी ऐकू नये, असा फतवा काढून पाहावा. भारतात नूरजहाँची गाणी ऐकण्यास कोणतीच मनाई नाही. खरे म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये खर्‍या स्वातंत्र्यासाठी लोक आसुसलेले आहेत.

भारतातील कोणताही गायक पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही, हे हाफिज सईदला माहीत असले पाहिजे, कारण तेथे कोणतीच व्यवस्था नाही. तथापि, पाकिस्तानातले अनेक गायक कलावंत भारतात येत राहतात. एकेकाळी लाहोर शहर आधुनिकतेचे आणि संस्कृतीचे केंद्रस्थान होते. मात्र, आज येथे सायंकाळनंतर स्मशान शांतता असते. विचित्र बाब म्हणजे पाकिस्तानातील भारतविरोधी वर्ग आणि भारतातील पाकिस्तानविरोधी वर्ग एकमेकांना साहाय्य करतात. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्यामुळे युद्ध टाळण्याचा प्रयत्न दोन्हीकडून झाला पाहिजे, कारण सध्याच्या काळातील युद्धात कोणाचे जास्त किंवा कमी नुकसान झाले, हा मुद्दा नाही. मुद्दा दोन्ही देशांकडून युद्ध थांबवण्याचा आहे. ज्या धर्मनिरपेक्षतेने भारताला पाकिस्तान होण्यापासून वाचवले आहे ती धर्मनिरपेक्षता खंडित केली जात आहे. तोच खरा इस्लामला मानणारा आहे ज्याचा शेजारी त्याच्यासोबत राहताना स्वत:ला सुरक्षित मानेल, याची आठवण हाफिज सईदला करून देणे गरजेचे आहे.