आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विंकल खन्नाचा मुलगा आणि भावी पिढी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील डीएनए वृत्तपत्रात चित्रपट कलावंतांनी लिहिलेले लेख नियमितपणे प्रकाशित होत आहेत. आतापर्यंत शाहरुखने तीन गूढ लेख लिहिले आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने आपल्या दैनंदिन कौटुंबिक समस्यांवर लेख लिहिले आहेत. एका ताज्या लेखात ट्विंकलने लिहिले आहे की, अक्षय कुमारने सकाळी 10 वाजता शूटिंगसाठी जाताना मुलावर कौटुंबिक सुरक्षेची जबाबदारी सोपवली. अक्षय गेल्यानंतर टीव्हीवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमात संसदेतील गोंधळाची काही दृश्ये दाखवण्यात आली. तसेच दोन राज्यांच्या विधानसभांमध्ये झालेल्या गोंधळाचीदेखील दृश्ये दाखवण्यात आली. ट्विंकलच्या मुलाने नेल कटर आणि स्क्रू ड्रायव्हरचे काम करू शकणारा स्वीडनमध्ये तयार झालेला चाकू उचलला आणि घराला संसद भवन समजून गोंधळ घातला. परिणामी सोफ्याला छिद्रे पडली आणि काही तोडफोडही झाली. या लेखात ट्विंकलने विनोदी स्वरूपात लिहिले आहे की, आपल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात ही गोष्ट पक्की बसली आहे की, खासदार होण्यासाठी शिक्षण नव्हे, तर गोंधळ घालण्याची क्षमता असली पाहिजे. कदाचित निवडणुकीत उतरण्याच्या वयापर्यंत तो गोंधळ घालण्यात पूर्णपणे प्रवीण होऊ शकेल.
हा लेख विनोदी स्वरूपात लिहिण्यात आला आहे. मात्र, ज्या ढंगाने मुलांना छोटा भीम प्रभावित करतो त्याच ढंगाने टीव्हीवर प्रसारित होणारा राजकीय गोंधळही प्रभावित करू शकतो, हे सत्यदेखील नाकारता येणार नाही. निवडणुकीच्या आखाड्याची दृश्येदेखील मुलांना प्रभावित करू शकतात. ही गोष्ट वेगळी आहे की, ते घरालाच कुरूक्षेत्र बनवून विध्वंस करणारा खेळ खेळता खेळता खरोखर त्यासारखेच होऊ शकतात. शालीनता आणि सद्वर्तन राजकारणातून नष्ट झाले आहे. अनेक दशकांपूर्वी इरविंग वॅलेस यांची कादंबरी ‘द मॅन’मध्ये एक कृष्णवर्णीय व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष झाल्याची कथा आहे. तसेच यातील एक प्रकरण इम्पिचमेंटचे असून त्याअंतर्गत सीनेट अध्यक्ष न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी आपला लहानपणीचा मित्र व निष्णात वकिलास भेटतो. त्याने आपली बाजू मांडावी अशी अध्यक्षांची इच्छा असते. मात्र, मित्र म्हणतो की, त्याने आपले लहानपणीचे स्वप्न म्हणजेच एक हजार एकरातील रँच (पशुसंगोपन मळा) मिळवण्यासाठी एका समुदायासोबत काम करण्याचा करार केला आहे. अपार धनसंपत्ती मिळवून देणार्‍या या करारामुळे त्याच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि सुविधाजनक होईल.
वकिलाची पत्नी आपल्या पतीकडे आग्रह धरते. हा करार मोडून आपल्या मित्राची केस लढवा, असे ती म्हणते. कारण एका कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षाला केवळ तो कृष्णवर्णीय असल्यामुळे षडयंत्राचा शिकार बनवून अन्याय आधारित समाजाची निर्मिती केली जाऊ शकते. तसेच कोणाचीही मुले अशा समाजात सुरक्षित राहू शकत नाहीत. मग भलेही त्यांच्याकडे हजार एकर भूखंड असला तरीसुद्धा ते सुरक्षित राहू शकत नाहीत. पत्नीने असे म्हटल्यानंतर पतीची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होते. भावी पिढीची सुरक्षा कशा प्रकारच्या समाजात किंवा सरकारमध्ये शक्य असेल, असा विचार आज एखादा नेता किंवा सामान्य माणूस करू शकतो का? अनेक शतकांच्या चाळणीतून चाळून आलेल्या सत्य व आदर्शांना तिलांजली देऊन करण्यात आलेले राजकारण कशाप्रकारचे समुद्रमंथन असेल? किंवा त्यात अमृत कमी व विष जास्त उत्पन्न होईल? खरे म्हणजे विचार करण्याच्या क्षणाला एकमेव क्षण म्हणता येणार नाही. कारण त्याच्या उदरात भविष्य आहे व त्याच्या डीएनएमध्ये इतिहास आहे.