आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anniv: किशोर दांचा हा फोटो ठरला शेवटचा, जाणून घ्या कुणासोबत काढला होता आणि बरेच काही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किशोरदांचा हा शेवटचा फोटो आहे. निधनाच्या एका दिवसापूर्वी म्हणजे 12 ऑक्टोबर 1987 रोजी बप्पी लहरींसोबत काढलेला हा फोटो आहे.)
भारतीय सिनेसृष्टीत सदाबहार अभिनेते, गायक किशोर कुमार यांची आज 86 वी जयंती आहे. 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गांगुली कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याच्या बळावर किशोर कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पार्श्वगायक आणि अभिनेत्याबरोबरच किशोर कुमार दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली. मात्र प्रेमाने त्याला गंगोपाध्याय म्हणून हाक मारली जात होती. मात्र नंतर त्यांनी आपले नाव आभास कुमारहून किशोर कुमार असे ठेवले. 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
किशोर कुमार यांच्या खागसी आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास ते चार बहिणभावंडांमध्ये (अशोक कुमार, सती देवी, अनूप कुमार आणि किशोर कुमार) सर्वात लहान होते. त्यांचे वडील कुंजालाल गांगुली एक वकील होते, तर आई गृहिणी होत्या. किशोर यांनी आपल्या आयुष्यात चार वेळा लग्न केले. त्यांची पहिली पत्नी रुमा गुहा ठाकुरता उर्फ रुमा घोष (1951-1958), दुसरी पत्नी अभिनेत्री मधुबाला (1960-1969), तिसरी पत्नी अभिनेत्री योगिता बाली (1976-1978) आणि चौथी पत्नी लीना चंद्रावरकर (1980-1987किशोर कुमार यांच्या निधनापर्यंत) होत्या. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा गायक अमित कुमार (पहिली पत्नी रुमा गुहापासून) आणि सुमीत कुमार (पत्नी लीना चंद्रावरकरपासून ) ही त्यांची नावे आहेत.
किशोर कुमार यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॉम्बे टॉकीजमध्ये कोरस सिंगरच्या रुपात केली. 1946 मध्ये 'शिकारी' या सिनेमाद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांचे थोरले बंधू मेन लीडमध्ये होते. 1948 मध्ये 'जिद्दी' या सिनेमातील मरने की दुआएं क्यों मांगू हे गाणे गाऊन त्यांनी आपले प्लेबॅक सिगिंग करिअर सुरु केले होते. किशोर दांनी फक्त हिंदीतच नव्हे तर अनेक भाषेत गाणी गायली. त्यांनी बंगाली, हिंदी, मराठी, असमिया, गुजराती, कन्नड, भोजपूरी, मल्याळम आणि उडिया भाषेत गाणी गायली आहेत. याशिवाय किशोर दांना आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हे पुरस्कार त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून देण्यात आले होते.
आज त्यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांची दुर्मिळ छायाचित्रे येथे दाखवत आहोत..