आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या 16 व्या वर्षी मिस इंडिया बनल्या होत्या नूतन, त्यापूर्वीच झाली होती सिनेसृष्टीत एन्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांची आज 79 वी जयंती आहे. 4 जून 1936 रोजी मुंबईत जन्मलेल्या नूतन, दिग्दर्शक आणि कवी कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या थोरल्या कन्या होत्या. त्यांच्या दोन बहिणी तनुजा (काजोल आणि तनिषा मुखर्जीची आई) आणि चतुरा बॉलिवूड अभिनेत्री आहेत. नूतन अभिनेता मोहनिश बहलच्या आई आणि अभिनेत्री काजोलच्या मावशी होत्या.
वयाच्या 16 वर्षी बनल्या मिस इंडिया
नूतन यांनी 1952 मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. यावर्षी दोघीजणी मिस इंडिया पेजेंट्स ठरल्या होत्या. पहिल्या म्हणजे इंद्राणी रहमान आणि दुस-या नूतन विजयी ठरल्या होत्या. या इव्हेंटमध्ये नूतन यांनी मिस मसुरीचा मानसुद्धा मिळाला होता. त्यावेळी नूतन केवळ 16 वर्षांच्या होत्या.
नूतन यांच्या आई होत्या उत्कृष्ट अभिनेत्री
नूतन यांच्या आई शोभना समर्थ आपल्या काळातील सुंदर आणि कुशल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. शोभना समर्थ यांनी पौराणिक कथांवर आधारित सिनेमांमुळे लोकप्रियता मिळवली होती. नूतन यांचे वडील कुमार सेन समर्थ निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. नूतन यांनी जयपूर घराण्याचे पंडीत जगन्नाथ प्रसाद यांच्याकडून संगीताचे धडे घेतले होते.
1945मध्ये जनक पिक्चर्सच्या बॅनर आणि वडील कुमार सेन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'नल दमयंती' या सिनेमाद्वारे नूतन यांनी बालकलाकार म्हणून पडद्यावर पदार्पण केले होते. या सिनमात नायिका म्हणून नूतन यांच्या आई शोभना समर्थ आणि नायक म्हणून पृथ्वीराज कपूर झळकले होते.

वयाच्या 14 व्या वर्षी सुरु केले होते करिअर
नूतन यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 1950 मध्ये आलेला 'हमारी बेटी' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यांच्या आई शोभना समर्थ या सिनेमाच्या निर्मात्या होत्या. त्यानंतर आलेल्या 'नगीना', 'शशीम', 'हंगामा', 'आगोश' या सिनेमांमध्ये नूतन यांच्या नायकाच्या भूमिकेत दिलीप कुमार यांचे थोरले बंधू नासिर खान होते.
1951मध्ये रिलीज झालेल्या 'नगीना' हा एक सस्पेन्स सिनेमा होता. रंजक गोष्ट म्हणजे हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर नूतन यांना सिनेमा बघण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. कारण त्यावेळी त्या अल्पवयीन होत्या.
नूतन यांनी सुनील दत्त यांच्या ब-याच सिनेमांमध्ये नायिकेची भूमिका साकारली होती. सुजाता, खानदान, मेहरबान, मिलन, गौरी, भाई बहन हे प्रमुख सिनेमे होते. तर राजकपूर यांच्यासह कन्हैय्या, अनाडी, दिल ही तो है, बंदिनी, सूरत और सिरत, दिल ने फिर याद किया, दुल्हन एक रात की, छलिया या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.
'सीमा'साठी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार...
1955 मध्ये रिलीज झालेल्या 'सीमा' या सिनेमात नूतन यांनी सुधारगृहातील कैद्याची भूमिका साकारली होती. या सिनेमातील सशक्त अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
यादरम्यान त्यांनी देवानंद यांच्यासह 'पेइंग गेस्ट' आणि 'तेरे घर के सामने' या सिनेमांमध्ये हलक्याफुलक्या भूमिका साकारुन आपल्या बहुआयमी प्रतिभेचा परिचय करुन दिला. 1958 मध्ये रिलीज झालेल्या 'सोने की चिडिया' हा सिनेमा हिट झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत नूतन यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.
वयाच्या 23 व्या वर्षी केले होते लग्न
1959 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी नूतन यांनी ल्यूटनेंट कमांडर रजनीश बहलसोबत लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांच्या घरी मोहनीश बहलचा जन्म झाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणा-या अभिनेत्री
नूतन या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वाधिक अवॉर्ड मिळवणा-या अभिनेत्री आहेत. त्यांना पाच सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले होते. 'सीमा' (1957), 'सुजाता' (1959), 'बंदिनी' (1973), 'मिलन' (1967) आणि 'मैं तुलसी तेरे आंगन की' (1978) हे ते सिनेमे आहेत. याशिवाय 'मेरी जंग' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला होता.
पद्मश्री देऊन भारत सरकाने केला होता गौरव...
1974 मध्ये भारत सरकारने नूतन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
वयाच्या 54 वर्षी मालवली प्राणज्योत
1991 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी नूतन यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होत्या. 'नसीबवाला' आणि 'इन्सानियत' हे दोन सिनेमे त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नूतन यांची निवडक छायाचित्रे...