आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: वडिलांची घड्याळ विकून मुंबईत दाखल झाले होते \'ज्युबली कुमार\', जाणून घ्या संघर्षाविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1960 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राजेंद्र कुमार बॉलिवूडमधील असे एक अभिनेते आहेत, जे आपल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून नेहमीच सिनेरसिकांच्या स्मरणात राहतील. बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या राजेंद्र यांना सहजासहजी येथे यश मिळाले नव्हते. अनेक कठीण परिस्थितींना सामोरे गेल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. कुणाचाही वरदहस्त नसताना राजेंद्र कुमार यांनी मायानगरीत प्रवेश घेतला होता. 'ज्युबली कुमार' या नावाने प्रसिद्ध झालेले राजेंद्र कुमार यांनी हार न पत्करता स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
वडिलांची घड्याळ विकून दाखल झाले होते मुंबईत...
20 जुलै 1929 रोजी सियायलकोट (आता पाकिस्तानात आहे) येथे राजेंद्र कुमार यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला होता. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल होताना केवळ 50 रुपये त्यांच्याकडे होते. विशेष म्हणजे आपल्या वडिलांची घड्याळ विकून त्यांनी हे पैसे मिळवले होते. ती विकून त्यांना 63 रुपये मिळाले होते. त्यातून 13 रुपयांचे त्यांनी रेल्वेचे तिकिट खरेदी केले होते.
150 रुपये मासिक वेतनावर केले काम....
मुंबईत दाखल झाल्यानंतर गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मदतीने त्यांना एच. एस रवैल यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांना 150 रुपये मासिक वेतन मिळत होते. राजेंद्र यांना 1950 मध्ये 'जोगन' या सिनेमात काम करण्याची पहिली संधी मिळाली. या सिनेमात दिलीप कुमार मेन लीडमध्ये होते.
'मदर इंडिया'तील छोट्याशा भूमिकेतून वेधले सिनेरसिकांचे लक्ष....
1950 ते 1956 सालापर्यंत ते फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष करत राहिले. 1957 मध्ये महबूब खान यांच्या 'मदर इंडिया' या सिनेमात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमासाठी त्यांना एक हजार रुपये मानधन मिळाले होते. हा सिनेमा खरं तर नर्गिस मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू होत्या. मात्र राजेंद्र कुमार आपल्या छोट्याशा भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले. 1959 मध्ये रिलीज झालेला विजय भट यांचा 'गुंज उठी शहनाई' हा त्यांच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. 1963 मध्ये आलेल्या 'मेरे महबूब' या सिनेमाने त्यांचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.
'ज्युबली कुमार' म्हणून निर्माण केली ओळख...
1964 ते 1970 दरम्यानचा काळ त्यांच्या करिअरमधील सर्वात चांगला काळ ठरला. या काळात रिलीज झालेल्या त्यांच्या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर सिल्व्हर ज्युबली पूर्ण केली. त्यामुळेच त्यांना त्यांच्या चाहत्यांनी 'ज्युबली कुमार' ही उपाधी प्रदान केली.
पद्मश्रीने सन्मानित...
1969 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. राजेंद्र कुमार दीपा मेहताच्या 'अर्थ' (1998) या सिनेमात एका छोटेखानी भूमिकेत शेवटचे पडद्यावर झळकले होते. 1980 च्या दशकात त्यांनी त्यांचा मुलगा कुमार गौरवला स्टार बनवण्यासाठी काही सिनेमांची निर्मितीसुद्धा केली. मात्र मुलगा कुमार गौरव त्यांच्यासारखी प्रसिद्धी मिळवू शकला नाही.
90 च्या दशकात घेतला कायमचा निरोप..
90 च्या दशकात राजेंद्र कुमार यांनी काम कमी केले. आपल्या सशक्त अभिनयाने चार दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या राजेंद्र कुमार यांनी 12 जुलै 1999 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
राजेंद्र कुमार यांची काही दुर्मिळ छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...