मुलगा अभिषेक बच्चनचा सोलो रिलीज असलेल्या 'ऑल इज वेल' या सिनेमाला हिट करण्यासाठी
बिग बी अमिताभ बच्चन बरेच प्रयत्न करत आहेत. अभिषेकचा शेवटचा दम मारो दम हा सोलो सिनेमा फ्लॉप ठरला होता. 2011 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. आता तब्बल चार वर्षांनी त्याचा सोलो सिनेमा येतोय. या सिनेमाला हिट करण्याची जबाबदारी अभिषेकनेच उचलली आहे.
सिनेमात असीन, ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. उमेश शुक्ला या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांनी दिग्दर्शित केलेला 'ओह माय गॉड' हा सिनेमा हिट ठरला होता. मात्र सिनेमाच्या हिट-फ्लॉपची जबाबदारी हीरोवर असते, त्यामुळे आपल्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी बिग बी पुढे आले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात अभिषेकच्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी ऋषी कपूर यांचे नाव समोर आल्यानंतर बिग बींनीच त्यांना फोन करुन ही भूमिका करण्याची विनंती केली होती. आता बातमी आहे, की बिग बींनी सिनेमाचे सॅटेलाइट राइट्सचा करार 16 कोटींमध्ये करुन दिला आहे.
सिनेमाचा निर्मिती खर्च 25 कोटी आणि प्रिंट-प्रचारचा खर्च 10 कोटी इतका आहे. एकुण 35 कोटींपैकी बिग बींनी सिनेमाला 16 कोटी रुपये मिळवून दिले आहेत.
अमिताभ यांनी यापूर्वी 'भूतनाथ रिटर्न्स'साठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. बी.आर. चोप्रांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याने बिग बींनी एका नामांकित टीव्ही चॅनलला 18 कोटींमध्ये सिनेमाचे हक्क विकण्यास मदत केली होती.