प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'स्वदेश', 'सत्या', 'कयामत से कयामत तक' या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे 49 वर्षीय अभिनेते मकरंद देशपांडे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. निवेदिता पोहनकर हे त्यांच्या होणा-या पत्नीचे नाव असून ती एक लेखिका आहे. गेल्या सहा वर्षांपासून या दोघांची मैत्री आहे. आता त्यांनी आपल्या मैत्रीचे रुपांतर लग्नात करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मकरंद यांनी सांगितले, ''होय आम्ही पुढील वर्षी लग्न करणार आहोत. लग्नासाठी माझ्या कुटुंबीयांकडून दबाव आला, म्हणून मी करतोय, असे मुळीच नाहीये.''
विशेष म्हणजे निवेदितापूर्वी दोन जणी मकरंद यांच्या आयुष्यात आल्या होत्या. त्यापैकी एक होती संजना कपूर. अभिनेते शशी कपूर यांची कन्या असलेल्या संजनासोबत मकरंद रिलेशनशिपमध्ये होते. मात्र तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'दिल चाहता है' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत त्यांचे सुत जुळल्याचे बोलले जात होते.
निवेदिता पोहनकर ही 'लय भारी' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री अदिती पोहनकरची बहीण आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, निवेदिता आणि मकरंद यांची खास छायाचित्रे...
(फोटो साभारः निवेदिता पोहनकरचे फेसबुक अकाउंट)