इम्तियाज अली दिग्दर्शित 'तमाशा' या सिनेमासाठी अभिनेता रणबीर कपूरने 25 कोटी रुपये फीस म्हणून घेतले होते. कोर्सिका आणि अन्य परदेशी लोकेशन्सवर शूट केल्याने या सिनेमाचे बजेट वाढले.
निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी सिनेमाचे राईट्स 65 कोटींमध्ये यूटीव्हीला विकले आहेत. सहसा या बजेटमधील सिनेमांचे टीव्ही हक्क हे 30 ते 35 कोटींच्या घरात विकले जातात. मात्र यावर्षी सटॅलाइट बाजार क्रॅश झाल्याने हिट श्रेणीमधील सिनेमांचे टीव्ही हक्क केवळ 12 ते 19 कोटींच्या घरातच विकले गेले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''रणबीरच्या या सिनेमाचे टीव्ही हक्क अद्याप विकले गेलेले नाहीत. निर्मात्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी त्याने आपल्या मानधनातील 5 कोटी रुपये निर्मात्याला परत केले.''
साजिद नाडियाडवाला यांनी ही रक्कम स्वतःकडे न ठेवता यूटीव्हीला दिले आहेत. साजिदच्या मते, यूटीव्ही ही रक्कम सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपयोगात आणू शकेल.
आणखी एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''बेशरम, बॉम्बे वेलवेट आणि रॉय फ्लॉप ठरल्यानंतर रणबीरच्या स्टारडमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या शुक्रवारी रिलीज होणारा रणबीरचा दीपिकासोबतचा 'तमाशा' त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे.''
रणबीरने निर्मात्यांचा खर्च बघता मानधन कमी केल्याने याचा फायदा त्याच्या गुडविलला होतोय.