आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Germany Crazy About Movies. Long Que For Ticket. People Are Enjoying Movies Alot

अंगावर शहारे आणणारा चित्रपट ‘विक्टोरिया’, बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील लक्षवेधी सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरळ, सोपा, सहज घडणारा, तरीही क्षणाक्षणाला एक्साईटमेन्ट वाढवणारा सिनेमा कुठला असं जर कुणी विचारलं तर मी एकच नाव घेईन, 'विक्टोरिया' (2015). 65 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये विक्टोरिया दाखवला गेला तेव्हा तो पाहणा-या प्रत्येकाच्या चेह-यावर एक उत्तम सिनेमा पाहिल्याचा आनंद दिसत होता.

हा चित्रपट आहेच तसा, सिनेमा संपल्यानंतरही मनात रेंगाळणारा. अनेक प्रश्न आणि त्याची उत्तर मिळवून देणारा आणि हा असा सिनेमा कसा काय बनवला जाऊ शकतो यावर वारंवार विचार करायला लावणारा. मग आपल्याकडे हा असा सिनेमा का बनू शकत नाही असा आपसुक विचार आपल्या मनात येतो. त्याचं उत्तर ही मिळतं, आपल्याकडे सिनेमा बघणारे प्रेक्षक अजून तयार झालेले नाहीत. म्हणून कदाचित एन्टरटेन्मेन्ट, एन्टरटेन्मेन्ट आणि एन्टरटेन्मेन्ट असं गणित असलेले आणि ते मांडूून गल्ला जमवणारे सिनेमे आपल्याकडे बनतात. अगदी 100 कोटींच्या घरात पोचतात आणि टेम्भा मिरवतात. पण अशा कोटींची गणितं मांडणा-या 100 सिनेमांना पुरुन उरेल असा आहे हा विक्टोरीया. त्याचं कारण ही तसंच आहे.

"विक्टोरिया" सिनेमा बर्लिनमध्ये घडतो हे विशेष. सिनेमाची टैगलाईन आहे "वन गर्ल, वन नाईट, वन सिटी, वन शॉट". सुरुवातीला विक्टोरियाचं पोश्टर जेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं असेल "रन लोला रन" सारखा सिनेमा. पण विक्टोरिया लोलाच्या पुढचा आहे. कारण एका रात्री घडणारी ही थ्रिलींग गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे. आपल्याकडे एखादा सैतानसारखा सिनेमा येतो आणि आसपासच्या अस्वस्थ भोवतालची चाहुल लागते. ती आपल्याला ही अस्वस्थ करते. पण विक्टोरिया फक्त अस्वस्थ करत नाही तर ती तोंडात बोट घालायला लावते. स्क्रिनवर जे काही घडतंय हा 134 मिनिटांचा सिनेमा एका शॉटमध्ये कसा काय घडू शकतो. याचं आश्चर्य आणि कौतूक वाटत राहतं.

स्पेनहून जर्मनीत आलेली विक्टोरीया ही 18-20 वर्षांची मुलगी एका डिस्को क्लबमध्ये थ्रील एन्जॉय करायला आलीय. ती बर्लिनमधल्या एका कैफेमध्ये काम करते. बर्लिनमध्ये युरोपातल्या इतर देशातून आलेले अनेक तरुण पहायला मिळतायत. कैफे, खाणाची ठिकाणं, हँग आऊट प्लेसेस मध्ये हा तरुणवर्ग काम करतो. युरोपात जर्मनीची आर्थिक स्थिती जरा बरी असल्यानं विक्टोरियासारखे असंख्य लोक इथं येतात आपला उदरनिर्वाह करतात आणि सर्वात जास्त मज्जा करतात. विक्टोरियाला ही अशीच मज्जा करायचेय. मग तिला चार लोक भेटतात, सोन, बॉक्सर, ब्लिंकर आणि फुज. हे चौघे जर्मनीतलेच. रात्री मज्जा करायला बाहेर पडलेले. सोन फ्लर्ट आहे. त्याच्या सारखीच दिसणारी वाटणारी विक्टोरियाला तो सहज हेरतो. तिच्याशी फ्लर्ट करतो. चौघे अगोदर स्टैनली कुबरिकच्या क्लॉकवर्क ऑरेन्जमधले ड्रुग्स वाटतात. ते ड्रुग्स नाहीत पण तसेच आहेत काही प्रमाणात. बर्लिनच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या चोरणं, रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावरुन भरधाव गाड्या चालवणं आणि निरर्थक फिरणं हे असं सर्व त्याचं सुरु आहे. पण हे सुरु असतानाच त्याचा एक छुपा प्लान आहे. बॉक्सर काही दिवस जेलमध्ये होता, त्यावेळी जर्मनीतल्या एका माफियानं त्याला मदत केली होती. आता बॉक्सरला त्याची परतफेड करायचीय. त्यासाठी चौघांची गरज आहे. पण फुज दारु प्यायल्यानंतर अगदी बेशुध्द पडलाय. त्याचा काय उपयोग नाही. मग बॉक्सर विक्टोरियाला चौथा भिडू बनवतो. आता हा माफिया त्यांना एक बँक लुटण्याची ऑफर देतो. ती नाकारण्याचा प्रश्नच नसतो. कारण ती नाकारणं म्हणजे मृत्यू. सोन मनात नसताना विक्टोरियाला प्लानमध्ये सामील करतो.. यापुढचं नाट्य हे बँक लुटणं, तिथून सही सलामत बाहेर पडणं, पुन्हा त्याच क्लबमध्ये जाऊऩ नाचणं आणि तिथू ते पैसे देण्यासाठी माफियांकडे जात असतानाच पोलीस मागे लागणं. पोलीसांशी.चकमक. त्यात बॉक्सर आणि ब्लिंकरचा मृत्यू. विक्टोरिया आणि सोननं बर्लिनमधल्या.एका घरात घेतलेला आसरा. या घरातल्या लहान मुलाचा आधार घेऊन तिथून काढलेला पळ. आणि पोलीसांच्या चकमकीत जखमी झालेल्या सोनचा मृत्यू. शेवटी 50000 युरो सहित निर्मनुष्य रस्त्यावरुन एकटीच जाणारी विक्टोरीया असं हे सर्व थ्रील करणारं नाट्य. क्षणाक्षणाला विक्टोरिया आणि आत्तापर्यंत तिच्याशी भावनिक नातं तयार झालेल्या प्रेक्षकांना धक्का देत जातं. पुढे काय होणार याचा अंदाज घेण्यापुर्वीच जे घडतं त्याच्यातून विक्टोरियाला बाहेर कशी पडणार याचा विचार ती स्वतः आणि प्रेक्षक दोघे करत असताता. तेवढ्यात नवा प्रसंग येतो. पुन्हा गुंतागुंत होते ती सोडवताना विक्टोरिया आणि प्रेक्षकांची दमछाक होते. जेव्हा ती या सर्वातून बाहेर येते तेव्हा प्रेक्षक ही सुटकेचा निःश्वास टाकतात. थिएटरमधून बाहेर आल्यावर रिलीफ झाल्यासारखे वाटतात. निःश्वास सोडता. कारण विक्टोरिया इतकाच थ्रील या प्रेक्षकांनी अनुभवलेला असतो.
सिनेमाचा सिध्दांत पहिल्यांदा मांडणा-या ह्युगो मन्स्टरबर्गने प्रेक्षक आणि विक्टोरियात निर्माण झालेल्या या नात्याला इनर वर्ल्ड आणि आऊटरवर्ल्ड असं नाव दिलंय. हे दोन्ही जग एकत्र येतो तेव्हा सिनेमा घडतो असं ह्युगो म्हणतो. विक्टोरियाच्या बाबतीत ते तंतोतत खरं ठरतं.

विक्टोरिया एक थ्रिलींग अनुभव आहेच. पण तो सर्वात जास्त थ्रिलींग झालाय तो त्याच्या कॅमेरामुळं. 134 मिनिटांची ही फिल्म एका शॉटमध्ये शुट करण्यात आलीय. फक्त 20 पानांचे डायलॉग, सतत हलता कॅमेरा आणि जवळपास 10 ते 12 ठिकाणी घडणारं नाट्य कुठल्याही प्रकारे एडीट न करता जे काही पडद्यावर दिसतंय ते फार डोकं चकराऊन टाकणारं आहे. ही कॅमेरामन आणि सिनेमातल्या कलाकारांचं श्रेय आहे. सलग कॅमेरा मुवमेन्ट दिसल्यानंतर बीफोर फेम रिचर्ड लिंकवाईजचा सिनेमा पाहत असल्यासारखं वाटतं पण विक्टोरियातला कॅमेरा त्याच्या मुवमेन्ट प्रमाणे मनात ही उलथापालथ करणारा आहे. म्हणूनच सिनेमा संपल्यावर पहिल्यांदा सिनेमॅटोग्राफर सुद्राला ब्रांद ग्लोवेलचं नाव येतं. दिग्दर्शक सैबेस्टीन शीफरपेक्षा त्याचं काम तेवढच महत्वाचं आहे.

सिनेमातली दोन पात्र विक्टोरियाची भुमिका करणारी लाया कोस्ट आणि सोनची भुमिकेतला फेड्रीक लाव यांनी केलेल्या अभिनयाला सलाम. मज्जा करण्यासाठी निघालेले हे दोघं कसे घटना आणि परिस्थितीचे बळी पडतात हे दोघांनी उत्तम निभावलंय. सर्वात जास्त कौतुक करावसं वाटतं ते दिग्दर्शक सैबेस्टीन शीफरचं. युरोपातल्या युवकांचं त्याचं ऑब्जर्वेशन पक्क आहे. त्यांना काय वाटतं. मैत्रीसाठी काहीही करणा-या बेजबाबदार, भरकटत जाणा-या तरुणांमधला माणूस सैबेस्टीननं चांगला हेरलाय. शेवटी भरकटलेला असला तरी तो माणूस आहे. मज्जा ही त्याची पहली प्रायोरिटी असली तरी जगण, मृत्यूतलं गांभिर्य त्याला आहे. आणि सर्वात म्हणजे आपण जे करतोय ते अयोग्य आहे त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची जाणिव सैबेस्टीनच्या प्रत्येक पात्राला आहे. हीच पात्र विक्टोरिया सिनेमाला जास्त रिअॅलिस्टीक आणि थ्रिलींग बनवतात. म्हणजे गोष्ट आणि ती पुढे घेऊन जाणारी पात्र असली म्हणजे सिनेमा हा खऱ्या अर्थानं सिनेमा बनतो. जर तुम्हाला खऱ्या सिनेमाची चव चाखायची असेल तर विक्टोरिया पहायलाच हवा.