आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॅकी चॅनच्या मृत्यूच्या ऑनलाइन अफवेने चाहत्यांना धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली /बीजिंग़ - हॉलीवूड अभिनेता जॅकी चॅनचा मृत्यू झाला, अशी ऑनलाइन अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला; परंतु खुद्द जॅकीने त्यावर खुलासा केल्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चॅन स्टंट करत होता. त्या वेळी त्याचा मृत्यू झाला, असे वृत्तात म्हटले होते. त्यामुळे या सुपरस्टारच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला. 23 जून रोजी ‘कित्झबभेल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता जॅकी चॅनचा मृत्यू झाल्याचे वृत्त पहिल्यांदा ग्लोबल असोसिएटेड न्यूजने प्रकाशित केले होते. ही घटना ऑस्ट्रियात घडली. जीएएनच्या संकेतस्थळावर ही बातमी झळकली होती. त्यानंतर काही वेळातच त्यावरील माहिती अपडेट करून मृत्यूची तारीख 5 ऑगस्ट करण्यात आली. त्याबरोबरच बातमीमध्ये अजून सुधारणा केली जात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु जॅकीच्या चाहत्यांना आपला आवडता सुपरस्टार गमावल्याचे दु:ख झाले. शूटिंग सुरू असताना जॅकी 50 फुटांवरून खाली कोसळल्याचे वृत्तात म्हटले होते. ऑस्ट्रियन पोलिसांच्या हवाल्याने ते प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यावर सहजपणे विश्वास बसला आणि ही अफवा वार्‍यापेक्षा अधिक वेगाने जगभरात पसरली. परंतु सुदैवाने जॅकी स्वत:च पुढे आल्याने या चर्चेवर आता पडदा पडला आहे.


मी ठणठणीत आणि माझा कुत्राही
हाय एव्हरीबडी ! काल (मंगळवारी) पहाटे 3 च्या सुमारास भारतातून बीजिंगला जाण्यासाठी विमान गाठले. त्यामुळे झोपमोड झाली आणि घरी परतल्यानंतर घराची स्वच्छता. त्यामुळे थकून गेलोय. अफवेमुळे चर्चेत असल्याबद्दल अनेकांनी माझे अभिनंदन केले. जिवंत असाल तर समोर येण्याचे आवाहनदेखील करण्यात येत होते. माझा मृत्यू झाला असता तर तसे काही सांगता आले असते. विश्वास बसत नसेल म्हणून आजच्या वर्तमानपत्रावरील तारीख दाखवणारा माझा फोटो सोबत देत आहे. असो. माझ्याबद्दल एवढे प्रेम दाखल्याबद्दल आभार. माझा कुत्रा पीएसदेखील माझ्याप्रमाणे ठणठणीत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, असे जॅकीने फेसबुकवरील पेजवर जाहीर केले आहे.