आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करसाठी रस्सीखेच अन् नामांकन प्रक्रियेवर टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी एकही भारतीय चित्रपट नसला तरी भारतीय संस्कृतीच्या मूल्यांना अप्रत्यक्ष व्यक्त करणारा यान मार्टेल या लेखकाच्या बुकर पुरस्कार विजेत्या कादंबरीवरील 'लाइफ ऑफ पाय' हा चित्रपट आहे. दिग्दर्शक आंग ली याने कादंबरीला दिलेला न्याय, कॉम्प्युटर अँनिमेशनचा अफलातून वापर आणि थ्रीडी तंत्रज्ञान या भांडवलाच्या बळावर या चित्रपटाला 11 ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. एक भारतीय मुलगा (सूरज शर्मा), त्याची समुद्रात भरकटलेली बोट आणि बोटीवर असलेला एक वाघ (रिचर्ड पार्कर) यांच्यावर आधारलेला हा चित्रपट 'देव' या संकल्पनेबद्दल भाष्य करेल, असे प्रेक्षकाला सुरुवातीला वाटते; पण कालांतराने माणसामधील असलेले मनुष्यत्व आणि पशूमधील पशुत्व यांच्यातील संघर्षाची कहाणी पाहायला मिळते. माणूस हा निसर्गाचा एक घटक असला तरी त्याचे पृथ्वीवरील अस्तित्व, त्याची जगण्यासाठीची धडपड दिसते. उडणार्‍या माशांचा थवा, रंगीबेरंगी जेली फिश, अजस्र अशा व्हेल माशाचे दर्शन आणि मांसाहारी बेट अशा आणि काही प्रसंगामुळे हा चित्रपट नयनरम्य अनुभव देतो. साथीला थ्रीडी तंत्रज्ञान आहेच. पण निसर्गाच्या चमत्कारिक घटनांचा आनंद लुटणार्‍या प्रेक्षकाच्या संवेदनांना नंतर धक्के बसू लागतात. तो वाघ आणि मुलाच्या जगण्याच्या संघर्षाशी तादात्म्य पाहून अस्वस्थ होऊ लागतो. 'लाइफ ऑफ पाय' या कादंबरीत असे अनेक प्रसंग आहेत, की ते वाचताना त्यांची कल्पनेच्या पातळीवर दृश्यबांधणी करता येऊ शकते. वास्तविक चित्रपट माध्यमात अशी दृश्ये जशीच्या तशी आणणे ही कठीणप्राय व आव्हानात्मक बाब आहे. पण आंग ली यांनी कॉम्प्युटर अँनिमेशन आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून अशा कल्पना पडद्यावर साकार केल्या आहेत. आंग ली यांच्या सेन्स अँड सेन्सिबिलिटी, क्राउचिन टायगर हिडन ड्रॅगन, ब्रोकबॅक माउंटन, द आइस स्ट्रॉम अशा चित्रपटांना समीक्षक आणि रसिकांनी याअगोदर डोक्यावर घेतले होते. मानवी जीवनाला स्पर्शून टाकणारे विषय, पण त्यांची आकर्षक मांडणी करताना तंत्रज्ञानाचा वापर अशी आंग ली यांची दिग्दर्शन शैली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांत स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या लिंकन (12 ऑस्कर नामांकने) या चित्रपटाने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. हा पुरस्कार सोहळा त्यामुळेच खरा रंगतदार ठरणार आहे.
ऑस्करच्या नामांकन प्रक्रियेवर टीका
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनांवरून काही गोष्टींवर वाद निर्माण झाला आहे. एक म्हणजे, 'लाइफ ऑफ पाय' या चित्रपटातील मुख्य नायक सूरज शर्मा याला उत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकनात स्थान मिळालेले नाही. तसेच 1979 मध्ये अमेरिकी राजनैतिक अधिकार्‍यांना इराणमध्ये ओलीस ठेवण्याच्या नाट्यावर आधारलेल्या 'अर्गो' व ओसामा बिन लादेन याला ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर आधारित 'झीरो डार्क थर्टी' या चित्रपटाचे दिग्दर्शक बेन अँफ्लेक व कॅथरिन बिगेलो यांचे उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराच्या नामांकनात स्थान नाही. (कॅथरिनला 2008 मध्ये 'द हर्ट लॉकर'साठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.) वास्तविक 'अर्गा' आणि 'झीरो डार्क थर्टी' हे विषय अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करणारे चित्रपट आहेत आणि त्याची चर्चाही खूप झाली आहे. दोन्ही चित्रपटांचा विषय वास्तववादी असल्याने विषयाशी प्रामाणिक राहत या दोघांनी चित्रपट अत्यंत जबाबदारीने हाताळला आहे, याचे अनेक दिग्गज चित्रपट समीक्षकांनी कौतुक केले आहे. गंमत म्हणजे नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये बेन अँफ्लेक याने आंग ली, स्टीव्हन स्पिलबर्ग व कॅथरिन बिगेलो यांना धक्का देत उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवून सर्वांनाच धक्का दिला. बेन अँफ्लेकच्या या यशामुळे त्याचे नाव ऑस्करच्या नामांकनासाठी का घेतले नाही, अशी चर्चा मीडियातून सुरू झाली आहे. ऑस्करच्या नामांकन प्रक्रियेवर दरवर्षी टीका होत असते. यंदाही ही परंपरा कायम आहे. दुसरीकडे कॅथरिन बिगेलोला लादेनच्या शोध मोहिमेचे अनेक गोपनीय संरक्षण दस्तऐवज दिल्याबद्दल व्हाइट हाऊस, सीआयएच्या अधिकार्‍यांनी नाराजी प्रकट केली आहे. ऑस्कर पुरस्कारापर्यंत हे वाद वाढत जाण्याची चिन्हे आहेत.