आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदीवासी ऑलिंपिक स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबिया, ब्राझील आणि पेरूच्या सीमेजवळ राहणार्‍या अमेझॉन परिसरातील आदिवासींनी आगळ्यावेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले होते. लंडन ऑलिम्पिक 2012 पेक्षा हे खूप वेगळे होते. 24 गावे व खेड्यांतील संघांनी 1000 पाउंडचे बक्षीस मिळवण्यासाठी अटीतटीची झुंज दिली.

जंगलात जगताना कसोटी लागणार्‍या क्षमतांनाच तेथील आदिवासींनी क्रीडा स्पर्धांमध्ये रूपांतरित केले. 500 महिला आणि पुरुषांनी झाडांची कटाई, डोंगी शर्यत, नेमबाजी आणि ब्लोपाइप शूटिंगसारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

झाडांच्या खोडाच्या सालापासून डोंगी आणि फांद्यांपासून धनुष्य बनवण्यात आले. एका स्पर्धेत महिला आणि पुरुषांनी लाकडाचे छोटे बाण दोन मीटर लांबीच्या फुंकणीतून फुंकून नेम साधला. दुसर्‍या स्पर्धेत स्पर्धकांनी झाडांच्या फांद्या कुर्‍हाडीने कापल्या. अँमेझॉनची उपनदी असलेल्या लोरिटोयाको या नदीच्या अस्वच्छ पाण्यात जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. ‘टिकून’ हा तेथील स्थानिक समुदाय आहे. या समुदायातील 20 वर्षांची लिना कास्त्रो ही मुलगी 100 मीटर फ्री स्टाइल रेसमध्ये सहभागी झाली तेव्हा या स्पर्धेतील आव्हानांचा विचार करत होती. ती म्हणाली की, स्पर्धा सुरू झाली तेव्हा मी शांत राहायला हवे होते. त्या वेळी मी पाण्यात राहणार्‍या प्राण्यांविषयी विचार करत होते. जुन्या परंपरा सुरक्षितरीत्या जपणे आणि पुढील पिढीच्या हाती सोपवणे, हा यामागील उद्देश असल्याचे या वस्त्यांमधील ज्येष्ठांचे मत होते.नेमबाजी आणि ब्लोपाइप स्पर्धेत सहभागी झालेले स्थानिक नेते ओल्गा बेस्टोज म्हणाले की, खेळ हे आमची संस्कृतीचे जतन करण्याचे एक माध्यम आहे. येथील आदिवासींना अस्तित्व नष्ट होण्याची भीती भेडसावत असते. अनेक तरुण जीन्स घालतात, अमेरिकन संगीत ऐकतात. बहुतांश आदिवासींना इथली भाषा येत नाही. ते स्पॅनिश भाषा बोलतात.