आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katyar Kaljat Ghusali Movie Selected For Federica Felini

सुबोध भावेच्या \'कट्यार\'ची \'युनेस्को\'च्या फेलिनी स्पर्धेसाठी निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कट्यार काळजात घुसली' चित्रपट म्हणजे सुमधूर संगीतात काय ताकद असते याचा उत्तम नमुनाच आहे - Divya Marathi
'कट्यार काळजात घुसली' चित्रपट म्हणजे सुमधूर संगीतात काय ताकद असते याचा उत्तम नमुनाच आहे
पुणे- आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाच्या समजल्या जाणा-या 'युनायटेड नेशन्सच्या फेलिनी' स्पर्धेसाठी सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण देशातून ‘कट्यार काळजात घुसली’या एकमेव चित्रपटाची निवड झाली आहे. यामुळे मराठी चित्रपटसृष्ठीत एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फेडरिको फेलिनी या दिग्गज दिग्दर्शकाच्या नावाने फ्रान्समधील 'कान्स चित्रपट महोत्सवा'त 1995 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी जगभरातून विविध भाषांतील चित्रपटांची निवड करण्यात येते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेसाठी विविध देशांतील चौदा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारतातून केवळ ‘कट्यार काळजात घुसली’ या एकमेव चित्रपटाची निवड करण्यात आल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेते सुबोध भावे याने दिली आहे.
या संदर्भात सुबोध भावे म्हणाले, मॉडर्न संगीताच्या काळामध्ये विस्मरणात जात असलेली आपली वैभवशाली संगीत नाट्य रंगभूमी पुन्हा तरुणांसमोर आणावी, यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चित्रपटाची निवड होणे, ही आपल्या कलेला आणि कलाकारांना मिळालेली एकप्रकारे पावतीच आहे. विविध महोत्सवांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत नाटक पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
गोवा येथे होणा-या 45व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्पर्धा विभागामध्ये नुकतीच ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. चाळीसच्या दशकातील ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकावर चित्रपट आधारित आहे. सुबोध भावे यांच्यासह सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, मृण्मयी गोडबोले, पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत.
'कट्यार' मराठीतील अनेक विक्रम मोडणार
दिवाळीत प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक सुबोध भावेच्या 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपटही राज्यभरात हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे. सुमधूर संगीतात काय ताकद असते त्याचा हा चित्रपट म्हणजे उत्तम नमुनाच होय. आजची पिढी फक्त 'शांताबाई' सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनाच नाही, तर 'सूर निरागस हो' सारख्या अभिजात संगीताला देखील तितक्याच आत्मियतेने स्विकारते हे कट्यारने दाखवून दिले आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसांत मराठीतील अनेक विक्रम मोडेल, असा अंदाज आहे.