आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निदिव्य' पेलणारा नाटककार हरपला, अशोक पाटोळे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- "आई रिटायर होतेय', "जाऊ बाई जोरात', "श्यामची मम्मी', "मी माझ्या मुलांचा' यांसारखी एकाहून एक भन्नाट गाजलेली मराठी नाटके, "हसरतें', "श्रीमान श्रीमती' यांसारख्या लोकप्रिय मालिका तसेच "चौकट राजा', "झपाटलेला' या लोकप्रिय चित्रपटांचे लेखक व प्रख्यात नाटककार अशोक पाटोळे (वय ६२) मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेले. अंतिम इच्छेनुसार अंत्यसंस्कार न करता त्यांचा देह दान करण्यात आला.
पाटोळे यांच्या नाट्यक्षेत्रात लेखक म्हणून मुशाफिरीला सुरुवात झाली १९७१ मध्ये. "आयजीच्या जिवावर बायजी उदार' ही त्यांनी लिहिलेली पहिली एकांकिका. त्यांची लेखणी गंभीर विनोदी असे दोन्ही बाज लीलया हाताळू शकायची. "झोपा आता गुपचूप', "प्रा. वाल्मीकी रामायण', "हीच तर प्रेमाची गंमत आहे' यांसारखी विनोदी नाटके त्यांच्याच लेखणीची करामत होती.

"चौकट राजा' हा गंभीर चित्रपट, तर "झपाटलेला' हा पूर्णपणे करमणूकप्रधान या दोन्ही चित्रपटांचे लेखन त्यांनी केले होते. दूरदर्शनवर विलक्षण लोकप्रिय ठरलेली त्यांनी लिहिलेली "श्रीमान श्रीमती' मालिका हे त्यांच्या प्रसन्न लेखणीचे आगळे रूप होते. "अध्यात मध्यात', "हद्दपार', "हसरते', "अधांतर' या मालिकांचेही त्यांनी लेखन केले होते. याशिवाय "सातव्या मुलीची सातवी मुलगी' हा कथासंग्रह "पाटोळ्यांच्या पाचोळ्या' हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता.
"एक चावट संध्याकाळ' या त्यांच्या नाटकाने काही वाद निर्माण केले होते. मात्र, त्या वादांना समर्थपणे उत्तरे देऊन त्यांनी आपल्यातील लेखक ठाम भूमिकाही घेऊ शकतो, हे दाखवून दिले होते. आपल्या जीवनप्रवासाची कहाणी अशोक पाटोळे यांनी "एक जन्म पुरला नाही' या आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवली आहे.

'अग्निदिव्य' पेलणारा नाटककार
प्रख्यातइतिहास संशोधक य. दि. फडके यांच्या ‘शाहू महाराज आणि लोकमान्य’ ह्या पुस्तकातील ‘ताई महाराज प्रकरण’ ‘वेदोक्त प्रकरण’ ह्या दोन प्रकरणांवर आधारित असलेले "अग्निदिव्य' हे नाटक अशोक पाटोळे यांनी लिहिले होते. या नाटकातील सामाजिक आशय, छत्रपती शाहू महाराजांचा जातिभेदविषयक संघर्ष आणि लोकमान्य टिळक-शाहू महाराज यांच्यातील खटकेबाज संवाद यांमुळे या नाटकाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. एखाद्या विषयाला नाट्यरूप देऊन प्रसंगांची उत्तम मांडणी आणि परिणामकारक संवाद यांद्वारे ते यशस्वी करून दाखवण्याचे कसब अशोक पाटोळे यांनी या नाटकात उत्तम साधले होते.

प्रेक्षकांची नस अचूक ओळखणारा लेखक
मी अशोक पाटोळे यांनी लिहिलेली "अधांतरी' ही मालिका दूरदर्शनवर केली होती. जयवंत दळवींच्या कादंबरीवर आधारित या मालिकेचे १३ भाग करायचे नियोजन होते, पण नंतर तिची लोकप्रियता पाहून ती २६ भागांची करण्यात आली. पुढे या मालिकेचे हिंदी रूपांतरही झाले. नाटकाबरोबरच दूरदर्शनच्या प्रेक्षकांची नसही पाटोळे यांना अचूक कळली होती. नाटकाचा पडदा पडेपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या नाटकांमध्ये होती. "हीच तर प्रेमाची गंमत आहे' या त्यांच्या नाटकात मला काम करण्याची संधी मिळाली.
- सुनीलबर्वे, अभिनेता
प्रेमळ माणूस
अशोक पाटोळे अतिशय प्रेमळ होते. पाटोळेंचा विनोदी लेखकांचा अभ्यास दांडगा होता. मराठी तसेच इंग्रजी विनोदी साहित्याचे त्यांचे वाचन विपुल होते. पटकथेची उत्तम जाण होती. हिंदीतल्या अनेक गाजलेल्या मालिका उदा. श्रीमान श्रीमती, हसरते, यस बॉस इत्यादींचे लेखक अशोक पाटोळे होते. माणूस म्हणून अतिशय गोड, कलाकारांपासून ते बॅकस्टेजवरचा माणूस, लाइटमन, ड्रायव्हर सगळ्यांशी आपुलकीने वागायचे, प्रत्येकाची बारकाईने चौकशी करायचे. मला थोरल्या भावासारखे होते. त्यांच्या जाण्याने चांगला लेखक आपण गमावला . - अजित केळकर, अभिनेते
बातम्या आणखी आहेत...