आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE : वाढदिवसाच्या दिवशी भरतेय तेजस्विनी पाच हजारांचा ‘दंड’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री तेजस्विनी पंडीतच्या बर्थडे सेलिब्रेशनची छायाचित्रे)
आज अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा वाढदिवस आहे. पण ती व्यस्त आहे, दिग्दर्शक संजय जाधवच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात. ‘तु हि रे’च्या सेटवर चित्रीकरणात व्यस्त असलेल्या तेजस्विनीचा वाढदिवस दिव्य मराठीने साजरा केला तिच्या मुंबईतल्या सेटवर जाऊन.

ब-याचदा कलाकार आपल्या वाढदिवसाच्यावेळी आपल्या घरच्यांसोबतच राहणं पसंत करतात. पण तेजस्विनी थोडी वेगळ्या मताची आहे. “वाढदिवसाच्या दिवशी काम केल्याने वर्षभर तुम्हांला काम मिळतं राहतं, अशी माझी श्रध्दा आहे. आणि त्यामुळे मी वाढदिवसाच्या दिवशीही चित्रीकरणामध्ये कशी व्यस्त असेन याचीच खबरदारी ब-याचदा घेते. आणि ज्यावर्षी मी वाढदिवसाला चित्रीकरणामध्ये व्यस्त नसते, त्यावर्षी मी माझ्या आईवडिलांसोबतच राहणं पसंत करते. यंदा मी संजयदादाच्या फिल्मसाठी बिझी आहे. पण दुपारी चित्रीकरण संपवून संध्याकाळी पुण्यात जाऊन आईसोबत वेळ घालवण्याचा प्लॅन बनवलाय.”

“हा माझा पहिला वाढदिवस आहे, जो दुर्देवाने माझ्या वडिलांविना असणार आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये माझ्या वडिलांच निधन झालं. त्यामुळे यंदाच्या वाढदिवसाला त्यांना मी खूप ‘मिस’ करतेय. वाढदिवस कशाला उगीच सेलिब्रेट करा, असाही विचार मनांत येतो. पण मला माहित आहे, माझ्या बाबाला जर मी आज सेलिब्रेशन नाही केलं, तर खूप वाईट वाटेल. आणि त्यामुळेच त्याच्या आठवणीत मी छान दिवस घालवणार आहे.”

“त्याचप्रमाणे यंदा वाढदिवस सेलिब्रेट करायला नेमका माझा नवराही माझ्यासोबत नाहीये. त्याला कामानिमीत्ताने अमेरिकेला जावं लागलंय. पण त्याने तिथनं माझ्यासाठी एक खास गिफ्टही घेतलंय. पण आता ते गिफ्ट मला जुलैलाच तो परतल्यावरच मिळणार आहे.”

वाढदिवस सेटवर सेलिब्रेट करणा-या तेजस्विनीला तिच्या आठवणीतल्या भेटवस्तूंबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “माझ्या प्रत्येक वाढदिवसाला एक सोन्याचं नाणं खरेदी करण्याचा माझ्या आईवडिलांचा सुरूवातीपासूनचा रिवाज आहे. मला सोन्याच्या दागिन्यांची विशेष आवड नाही. पण आईवडिलांचा हा रिवाज मला खूप आवडतो.”

“ मी दहावीत असल्यापासून माझा नवरा भुषण माझा मित्र होता. त्यामुळे तेव्हा पासून आजपर्यंत दर वाढदिवसाला तो मला स्पेशल गिफ्ट्स देतच असतो. त्याचप्रमाणे माझी सख्खी बहिण अमेरिकेत राहते आणि ती दरवर्षी मला भेटवस्तू पाठवतेच. ”

“ खरं तर भेटवस्तूंपेक्षा मी वाढदिवसाच्या दिवशी कुणाला ना कुणाला गरजु व्यक्तीला मदत करते. मी पुण्यातल्या एका समाजसेवी संस्थेशीही निगडीत आहे. पण मला माझ्या समाजकार्याबाबत बोलायला आवडतं नाही. माझ असं मत आहे की, आपण आपल्या आउटिंग आणि सोशलायझेशनच्यावेळी आजकाल कमीत कमी हजार-दोन हजार सहज खर्च करतो. पण तोच पैसा निदान एकदा आपल्या वाढदिवशी जर कोणा गरजु व्यक्तीसाठी उपयोगी पडला तर त्या व्यक्तिच्या चेह-यावर फुलणारा आनंद इतर कुठल्याही ‘मटेरिअल’ गिफ्ट पेक्षा जास्त मोठा आहे.”

आपल्या चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा करणा-या तेजस्विनीला तिच्या सहकलावंतानी काय भेटवस्तू दिल्या असं विचारल्यावर तेजस्विनी हसायलाच लागली. “संजयदादाच्या फिल्ममध्ये काम करायचं म्हणजे इथे स्वप्निल-सई-संजय या त्रिकुटाच्या नियमावली पाळाव्या लागतात. आणि ह्या नियमावली तोडणा-याला दंड भरावा लागतो. सेटवर मोबाईल वाजला, यायला उशीर झाला तर दंड बसतोच. पण त्याचप्रमाणे सेटवर झोपलं किंवा काळे कपडे घातले तर १०० रूपये दंड भरावा लागतोच. आणि जर तुमचा वाढदिवस असेल तर पाच हजार रूपयांचा दंड आकारला जातो. गेल्या आठवड्यात सेटवर एका सहाय्यक दिग्दर्शकाला झालेला दंड पाहिल्यावर आज दंड भरण्याची मानसिक तयारी करूनच सेटवर पोहोचलेय."
(सर्व फोटो : अजित रेडेकर)