आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता आता पुन्हा स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनत घेणाऱ्या अक्षरनं 'छोटी मालकीण'साठीही खास मेहनत घेतली आहे.
स्टार प्रवाहबरोबर अक्षर कोठारीचं जुनं नातं आहे. त्यानं स्टार प्रवाहच्याच 'हे बंध रेशमाचे' या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'आराधना' या मालिकेतही काम केलं होतं. या दोन्ही मालिकांनी त्याला उत्तम अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. 'छोटी मालकीण' या मालिकेद्वारे अक्षर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहे. या पुनरागमनामुळे अक्षरच्या मनात परदेशात शिकून आपल्या घरी परतलेल्या मुलासारखी भावना आहे.
'श्रीधर' या व्यक्तिरेखेविषयी अक्षर म्हणाला, "माझी प्रत्येक भूमिका वेगळी दिसावी यासाठी मी लुकवर विचार करतो, मेहनत घेतो. सुदैवानं आतापर्यंत माझा विचार योग्य ठरला आहे. 'छोटी मालकीण' मालिकेची कथा माझ्याकडे आली. त्यातली 'श्रीधर' ही व्यक्तिरेखा वाचल्यावर माझ्या मनात काही चित्र तयार झालं. त्यात या श्रीधरला पिळदार मिशी असावी असं वाटत होतं. हा 'श्रीधर' छोट्या शहरातला तरूण आहे. मीही सोलापुरसारख्या शहरातला असल्यानं श्रीधरच्या मानसिकतेचा नेमक्या पद्धतीनं विचार करू शकलो. त्यामुळे मी मिशी पिळदार होण्यासाठी प्रयत्न केले. माझा लुक पाहिल्यावर श्रीधरला पिळदार मिशी असावी ही माझी कल्पना स्टार प्रवाहनंही मान्य केली.'
"स्टार प्रवाहनं अभिनेता म्हणून पहिली संधी दिली होती. त्यामुळे माझं आणि स्टार प्रवाहचं नातं खूप आपलेपणाचं आहे. 'छोटी मालकीण' या मालिकेच्या निमित्तानं मला घरी परत आल्यासारखं वाटतंय. माझ्या आधीच्या 'हे बंध रेशमाचे' आणि 'आराधना' या मालिकांप्रमाणे याही मालिकेवर प्रेक्षक नक्कीच प्रेम करतील याची मला खात्री आहे" असंही अक्षरनं सांगितलं.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.