आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi: \'या\'मुळे उषाताईंना सगळे म्हणतात \'आऊ\'... खासगी आयुष्याविषयी वाचा A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माहेरची साडी' हा मराठी चित्रपट आणि 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतील खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. उषाताईंना आता आपण सगळेजण बघतोय बिग बॉस मराठीच्या घरात. होय, उषा ताई बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. 'सैराट' चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर ताल धरत त्यांनी या शोचा मंच दणाणून सोडला. विशेष म्हणजे या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी सांगितल्यानुसार, बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यापूर्वीच उषाताईंच्या नावावर एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. ती म्हणजे उषाताई बिग बॉसच्या घरातील सर्वात वयोवृद्ध स्पर्धक आहेत. आजवर बिग बॉसचे हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील जेवढेही पर्व आले, त्यामध्ये वयाची सत्तरी ओलांडलेल्या स्पर्धक सहभागी झालेला नाही. महेश मांजरेकरांनी उषाताईंना बिग बॉस मराठीमधील सर्वात एनर्जेटिक तरुण स्पर्धक म्हणून संबोधले आहे.

 

72 वर्षांच्या आहेत उषा नाडकर्णी... 
उषा नाडकर्णी यांना बघून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे नक्कीच कुणालाही कठीण होईल. त्या 72 वर्षांच्या आहेत. पण त्यांचा उत्साह आणि कामाविषयीची धडपड ही तरुणाईला लाजवणारी आहे. 13 सप्टेंबर 1946 साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. खाष्ट सासूसोबतच प्रेमळ आईचीही भूमिका त्यांनी विविध चित्रपटांमधून साकारली आहे. एक बिनधास्त आणि मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना ओळखले जाते. चाळीस वर्षांहून अधिकचा काळ त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत, छोट्या पडद्यावर विविधांगी भूमिका वठवल्या आहेत.

 

20 वर्षे केली नोकरी...

अभिनय क्षेत्रात पूर्ण वेळ अभिनेत्री म्हणून काम करण्यापूर्वी उषा नाडकर्णी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत आणि त्यानंतर 20 वर्षे एका बँकेत नोकरी केली. पण त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. 

 

अशा झाल्या इंडस्ट्रीच्या 'आऊ'... 

उषाताईंना मराठी इंडस्ट्रीत सगळे आऊ म्हणून ओळखतात. त्यामागे एक किस्सा आहे. उषा ताईंचा मुलगा बालपणापासून त्यांना आऊ म्हणून हाक मारतो. तो लहान असताना उषाताई त्याला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जात असतं. एकदा त्या त्याला 'नशीबवान' या चित्रपटाच्या सेटवर घेऊन गेल्या होत्या. तेथे त्यांचा मुलगा त्यांना सतत आऊ.. आऊ म्हणून हाक मारत होता. उषा ताईंच्या मुलाप्रमाणेच सेटवर अलका कुबल, समीर आठल्येंसह सगळेच उषाताईंना आऊ म्हणू लागले. हळूहळू इंडस्ट्रीतील सगळेच उषा यांना आऊ म्हणू लागले आणि अशाप्रकारे उषा नाडकर्णी इंडस्ट्रीतील सगळ्यांसाठी आऊ झाल्या.  


वयाच्या 70 व्या वर्षी झाले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण...
वयाच्या 70व्या वर्षी स्वतःचे मोठे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे उषा नाडकर्णी यांनी बिग बॉसच्या मंचावर सांगितले. उषाताई म्हणाल्या, लग्न होऊन मी छोट्या घरात आले होते. स्वतःचं मोठं घर असावं, अशी सगळ्यांची इच्छा होती, माझीही ती होती. खूप कष्ट केले आणि वयाच्या 70 व्या वर्षी स्वतःचे मोठे घर घेतले. इनोव्हा गाडी घेण्याची इच्छा होती. मेहनतीच्या बळावर तीदेखील घेतली.  

 

उषाताईंच्या भावाचे झाले निधन...
उषा ताईंना एकुण चार बहीण भावंड. त्यांची एक बहीण बँकेत नोकरी करते. त्यांना एक भाऊ असून ते मुंबईत वास्तव्याला आहेत. उषाताईंना आणखी एक भाऊ होता. पण 1975 साली त्यांचे निधन झाले होते. उषाताईंच्या या भावाला संगीताची विशेष आवड होती. आजही भावाची आठवण झाल्यावर त्यांचे डोळे पाणावत असतात. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे धाकटे भाऊ त्यांना शुभेच्छा द्यायला मंचावर उपस्थित होते. 

 

या पॅकेजमधून जाणून घेऊयात, उषा नाडकर्णी यांच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...