आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे दीर्घ आजाराने निधन, अभिनेता विजय केंकरेंसोबत होते जवळचे नाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आणि बालरंगभूमीच्या विकासाला त्यांचे सर्वस्व वाहून देणाऱ्या सुधा करमरकर यांचे आज (दिनांक 5 फेब्रुवारी) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बालरंगभूमीचा इतिहास ज्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अशा सुधा करमरकर यांना विस्मरणाचा आणि शारीरिक व्याधींचा त्रास होता. नात्याने सुधाताई या अभिनेता विजय केंकरे यांच्या सख्ख्या मावशी होत्या.

 

बालरंगभूमीच्या कामानिमित्त त्यांना अमेरिकेत जायची संधी मिळाली आणि त्यांनी तेथील बालनाट्य आणि रंगभूमीचा चांगला अभ्यास केला होता. तेथेही त्यांनी अनेक बालनाट्यांची निर्मितीचे काम पाहिले. प्रशिक्षण संपवून त्या मुंबईत परतल्या आणि त्यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने त्यांनी १९५९ मध्ये ‘लिटिल थिएटर’ची स्थापना केली. ‘मधुमंजिरी’हे लिटिल थिएटरतर्फे सादर झालेले पहिले बालनाट्य. याचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी केले होते. तर दिग्दर्शन सुधा करमरकर यांचे होते. या नाटकात बाल कलाकारांसह प्रौढ कलाकारही होते. दस्तुरखुद्द सुधाताईंनी यात ‘चेटकिणी’ची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती.

 

लिटिल थिएटरच्या माध्यमातून सुमारे २५ बालनाटय़े त्यांनी सादर केली. या सर्व बालनाटकांचे दिग्दर्शन त्यांचेच होते. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’,‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’,‘चिनी बदाम’ या नाटकातून भक्ती बर्वे यांनी काम केले होते. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘जादूचा वेल’, ‘गणपती बाप्पा मोरया’ ही त्यांनी सादर केलेली आणखी काही बालनाटय़े. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांचे योगदान मोठे आहे. ‘विकत घेतला न्याय’,‘थॅंक्यू मि. ग्लाड’,‘पुत्रकामेष्टी’, ‘तो राजहंस एक’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘बेईमान’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘पती गेले गं काठेवाडी’ अशा व्यावसायिक नाटकातून त्यांनी काम केले. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘धि गोवा हिंदू असोसिशन’ या नाटय़संस्थांची निर्मिती असलेल्या बहुतेक नाटकांमधून त्यांच्या भूमिका होत्या. या सर्वच नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. विद्याधर गोखले लिखित ‘संगीत मंदारमाला’, व्यंकटेश माडगूळकर व वसंत सबनीस लिखित ‘संगीत पती गेले गं काठेवाडी’, वि. वा. शिरवाडकर लिखित ‘आनंद’, पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘चंद्र नभीचा ढळला’ आदी नाटकांचे दिग्दर्शनही सुधाताईंनी केले.

 

वाढत्या वयानुसार आणि अनेक शारीरिक व्याधी जडल्यानंतर त्यांच्या कामामध्ये खंड पडला.  त्यांना विस्मरणाचा त्रास होता पण  तरीही एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पार्श्वनाथ आळतेकर यांच्या नाट्यशिबीरात  शिकवलेले ‘कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं होणाऱ्या प्रयत्नांची वाटचाल..’ हे  वाक्य त्यांनी गप्पांचा समारोप करताना जसेच्या तसे म्हणून दाखविले होते. यावरुनच त्यांचे बालनाट्य आणि त्या कामाबद्दल असलेली निष्ठा दिसून आली होती. वृद्धत्वामुळे आलेल्या  सर्व व्याधींवर मात करतही त्यांनी शेवटपर्यंत बालनाट्याचे काम सुरु ठेवले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नाटकांमध्येच होते सुधाताई यांचे संपूर्ण कुटुंब...

बातम्या आणखी आहेत...