आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागराज मंजुळेंचा सवाल, पोलिओप्रमाणे जात हद्दपार होणार नाही का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. मानवाचा जन्म प्रेम करण्यासाठी मिळाला आहे. जात-पात ही मानवानेच निर्मिली आहे. आज भारतातून पोलिओ हद्दपार झाला म्हणून आपण मिरवतो, तशी जात नाही का हद्दपार होऊ शकत? असा सवाल करीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या मनातील भावना प्रगट   केल्या. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या बहुचर्चित नाटकाच्या ७००व्या प्रयोगाच्या निमित्ताने नागराज यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा ७०० वा प्रयोग अलीकडेच पार पडला.

 

शुभारंभाच्या प्रयोगापासूनच चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने मागील सहा वर्षांमध्ये विविध ठिकाणी प्रयोग करीत ७०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग पाहूनही नागराज मंजुळे यांनी ७०० व्या प्रयोगाला आवर्जून हजेरी लावली. याखेरीज निर्माता-अभिनेता भरत जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार दिलीप मोहिते-पाटील, पत्रकार युवराज मोहिते आदी मान्यवरांनीही या प्रयोगाला उपस्थित राहून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’च्या टिमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

 

एकविसाव्या शतकातही आपण जाती-पातीचं राजकारण करतोय याची घृणा येत असल्याचं सांगत नागराज म्हणाले की, जातीला मी माझा खूप मोठा शत्रू मानतो. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करीत आहे. आजच्या पिढीला याच विचारांची खरी गरज आहे. या दोन थोर व्यक्तींनी कधीच जात-पात, धर्मभेद बाळगला नाही. त्यांची कामगिरी चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य आजवर करण्यात आलं आहे. त्यामुळेच चांगले विचार देणारं चांगलं पुस्तक आणि वाईट विचार देणारं वाईट पुस्तक ही या नाटकात मांडलेली व्याख्या मला खूप भावली. हे नाटक पाहताना दोन वेळा माझ्या डोळे पाणावले. कारण या नाटकातील विचार थेट हृदयाला भिडणारे आहेत. या नाटकातील शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचं माप तुमच्या-आमच्या सर्वांच्या मेंदूशी जुळो ही सदिच्छा देत नागराज यांनी नाटकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


पुढे वाचा, अभिनेते भरत जाधव काय म्हणाले... सोबतच बघा, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’या नाटकाच्या ७०० व्या प्रयोगाला उपस्थित कलाकारांची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...