आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Music Launch:आदेश बांदेकरांनी केले ‘ट्रकभर स्वप्नं’चे म्युझिक लाँच, इव्हेंटला मुख्य अभिनेत्रीच गैरहजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाचं स्वप्न असतं… स्वत:च्या घराचं ! आपलं, आपल्या मालकीचं छोटंसं का नसेना पण घर असावं..! प्रत्येकाच्या मनामनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाला करावी लागणारी धडपड दाखविणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पण चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेते मकरंद देशपांडे मात्र यावेळी गैरहजर दिसले. 


आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि प्रस्तुत आणि प्रमोद पवार दिग्दर्शित हा चित्रपट 24 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रमोद पवार यांच्या मेहनतीचं व जिद्दीचं कौतुक करताना अभिनेते राजदत्त आणि आदेश बांदेकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. ही कथा आपल्या सगळ्यांची आहे असं सांगत आपल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


या कलाकारांच्या आहेत मुख्य भूमिका... 
मीना चंद्रकांत देसाई , नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाचे निर्माते असून मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी,मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर,विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत.


चित्रपटात एकुण चार गाणी... 
वेगवेगळ्या पठडीतली 4 गाणी ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘लुकलुकले स्वप्न’ हे प्रेमगीत, ‘सेल्फीवाली’ हे आयटम सॉंग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारे ‘धडक धडक’ गाणं आणि ‘देवा तुझ्या’ हे भक्तीमय गीत यांचा सुरेख नजराणा या चित्रपटात आहे. ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केले असून संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांचे आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

बातम्या आणखी आहेत...