आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांची यशोगाथा महानाटयरुपात, 'अजिंक्य योद्धा' येणार भेटीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार व विकास ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ह्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवेपद स्विकारते वेळी स्वराज्यात फौज नव्हती, सैनिक सरदार नव्हते, खजिना नव्हता परंतु बाजीरावांनी ह्यावर मात करून स्वराज्याचा विस्तार केला. निष्ठावंत सैनिकांतून मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे,  गोविंदपंत बुंदेला ह्यांसारख्या स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या अनेक शूर धाडसी सरदारांची फौज निर्माण केली. कुशाग्रबुद्धी, शस्त्रविद्या, युद्धनीती, मुत्सद्दीपणा, प्रशासन कौशल्य, चपळाई आणि नैसर्गिक व भौगोलिकतेचे भान यासारख्या गोष्टींचा योग्य वापर करून अजिंक्य योद्धा ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ह्यांनी थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारून दिल्लीवर भगवा फडकविला. बाजीरावांनी जो पराक्रम गाजवला त्याला तोड नाही. हिंदुस्थानातील निजाम, मोगल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय महासत्तांना मात देणारा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव’. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व, जीवन चरित्र व त्यांचा हा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने श्री. संजयजी पांडे यांच्या संकल्पनेतून ‘अजिंक्य योद्धा’ – ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ हे महानाटय लवकरच रंगभूमीवर साकारले  जाणार आहे.

 

‘पंजाब टॅाकीज निर्मित’ या महानाटय़ाची घोषणा व संगीत प्रकाशन सोहळा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोदजी तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात गाण्यांचे धमाकेदार सादरीकरण व ‘पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाटयाची छोटेखानी झलक दाखवण्यात आली. वरुणा मदनलाल राणा दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे लिखित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे हे ‘महानाटय़’ आहे. पेशवेंची कारकीर्द, त्यांच्या मोहिमा आणि शेवट असा संपूर्ण जीवनपट या महानाटयातून उलगडला जाणार आहे.

 

‘महाराष्ट्राला अतिशय दैदिप्यमान आणि तेजस्वी इतिहास लाभला आहे. तो पुढील पिढ्यांसमोर प्रभावीपणे मांडणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातूनच आगामी काळात चांगले आदर्श निर्माण होऊ शकतील’, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. परकीय महासत्तांवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण युद्धनीतीने मात करणारे ‘अजिंक्य योद्धे’ श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी अवघ्या ४० वर्षाच्या आयुष्यात गौरवशाली इतिहास घडविला. हा दैदिप्यमान इतिहास आजच्या पिढीपुढे यावा या उद्देशाने या महानाटयाची निर्मीती करण्यात आल्याचे या महानाटयाचे संकल्पनाकार संजय पांडे यांनी सांगितले.

 

‘अजिंक्य योद्धा’ या महानाटयाचा पहिला प्रयोग १२ मे ला शाहू विद्यालय पटांगण पुणे येथे होणार आहे. या महानाटय़ात १३० हून अधिक कलावंत सहभागी झाले आहेत. या विलक्षण महानाटय़ाचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन टीमच्या वतीने करण्यात आले आहे. या महानाटय़ास रसिक चांगला देतील, असा विश्वास टीमने व्यक्त केला.

 

‘अजिंक्य योद्धा’ श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ या महानाटयासाठी सहाय्यक दिग्दर्शन व कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अभय सोडये यांनी सांभाळली आहे. या महानाटयातील गाणी गायक आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते,  नंदेश उमप, वैशाली माडे यांनी गायली आहेत. आदर्श शिंदे यांनी गायलेलं शीर्षकगीत अप्रतिम झालेले आहे. संगीत आदि रामचंद्र, विनीत देशपांडे यांचे असून वेशभूषा पौर्णिमा ओक यांची आहे. प्रकाशयोजना भूषण देसाई यांची तर कलादिग्दर्शन आबिद शेख यांचे आहे. सूत्रधार योगेश मोरे, कुणाल मुळये, रुपेश परब आहेत. उमेश तावडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...