आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: 'स्वराज्यरक्षक संभाजी'साठी अमोल कोल्हेंनी 'या' खास ठिकाणी केले शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होत आहे. संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. अनेकांना वाटतं की, शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते... काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले... एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. शंभुराजे दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली येथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' च्या टीमने याच ठिकाणी चित्रीकरण करत एक अनोखा योग साधला आहे.

 

अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली नदीच्या पुरात घोडेस्वारी

शंभूराज दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली इथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या टीमनेही त्याच ठिकाणी या प्रसंगाचे चित्रीकरण अथक परिश्रम घेत झटून आणि जिद्दीने पूर्ण केले. हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल. ३४० वर्षांपूर्वी जिथे भेट घडली होती म्हणजेच श्री क्षेत्र माहुली येथे जाऊन चित्रीकरण करण्यात आले आहे.

 

त्या अनुभवाबद्दल संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे म्हणतात, "संभाजी महाराज आणि दिलेरखान यांची भेट जिथे झाली तो माहुलीचा भाग आजही जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे. माहुली संगमावर आम्ही हा प्रसंग चित्रित केला. धोधो पाऊस पडत होता, कृष्णावेण्णा नदीही जोरात वाहत होती. कधीही धरणाचे दरवाजे उघडले जातील अशी परिस्थिती होती अन त्यातच घोड्यावर बसून नदी पार करण्याचा प्रसंग साकारायचा होता. २ सेकंद विचार केला आणि बाकीच्या टीमची मेहनत पाहून घोड्याला टाच मारली. अशा वेळी तुमचा तुमच्यावर आणि तुमच्या घोड्यावर असलेला विश्वास महत्वाचा असतो. एके ठिकाणी नदी पात्रात अनपेक्षित खड्डा आला आणि त्यात घोडा अडकला मग त्याला बाहेर काढावं लागलं, पण प्रसंग खूप अप्रतिम चित्रित झाला आहे. प्रेक्षक हा प्रसंग 22 जुलैला प्रसारित होणाऱ्या महाएपिसोड मध्ये पाहू शकतील."

बातम्या आणखी आहेत...