आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मला विद्यार्थ्यांनी देवाचा दर्जा दिला\', सांगत आहेत रिअल लाईफ \'न्यूड मॉडेल\' लक्ष्मी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक महिलादिनानिमित्त सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका चित्रपटाची पत्रकार परिषद पार पडली. गेल्या काही महिन्यांपासून  'न्यूड (चित्रा)' या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून, झी स्टुडिओज् येत्या २७ एप्रिलला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. ह्या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते झी स्टुडिओज्चे मंगेश कुलकर्णी आणि अथांश कम्युनिकेशनच्या मेघना जाधव, लेखक सचिन कुंडलकर, चित्रपटातील कलाकार कल्याणी मुळे, छाया कदम, ओम भुतकर आणि मदन देवधर तसेच तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.

 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ,चित्रपटात मुलाच्या शिक्षणसाठी धडपड करताना एका कला महाविद्यालयात 'न्यूड मॉडेल' म्हणून काम करणाऱ्या यमुनेनी (कल्याणी मूळेंनी), खऱ्या आयुष्यात सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् महाविद्यालयात गेली ३० वर्ष ज्ञानदानाचे हेच काम करणाऱ्या लक्ष्मी यांना बोलते केले. लक्ष्मी यांनी त्यांना या प्रवासात आलेले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या,मला माझ्या कामाचा सार्थ अभिमान आहे. मला विद्यार्थ्यांनी इथे देवाचा दर्जा दिला आणि आता या विषयावर सिनेमा येऊ घातलाय. प्रेक्षकांसमोर आमची कथा मांडली जाणार आहे यासारखा दुसरा आनंद नाही.

 

न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराप्रमाणेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो. त्यामुळे 'न्यूड (चित्रा)' चित्रपटाविषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

 

अथांश कम्युनिकेशन्स आणि झी स्टुडिओज यांनी 'न्यूड (चित्रा)' चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर यांनी लिहिले आहेत. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाचे अप्रतिम छायाचित्रण केले आहे अमलेंदू चौधरी यांनी तर संकलन केले आहे अभिजीत देशपांडे यांनी. कथेला अनुसरुन  कला दिग्दर्शन करण्याची जबाबदारी संतोष फुटाणे आणि  महेश साळगावकर यांनी पेलली आहे आणि  वेशभूषा साकारली आहे मेघना जाधव यांनी. सौरभ भालेराव यांचं पार्श्वसंगीत चित्रपटात असून सायली खरे आणि विद्या राव यांनी वैयक्तिकरित्या या चित्रपटात दोन गाणी लिहिली आहेत आणि स्वरबद्धही केलेली आहेत.

 

येत्या काही दिवसांमध्ये ‘न्यूड’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणखी एक चौकटीबाहेरील कथानक मोठ्या पडद्यावर पाहाता येणार हे नक्की. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'न्यूड' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...